

Afghanistan-Pakistan conflict : पाकिस्तानला शांतता नको असल्यास आमच्याकडे इतर पर्यायही आहेत, असा इशारा देत अफगाणिस्तानचा सामान्य नागरिकांशी कोणताही वाद नाही;परंतु पाकिस्तानमधील काही घटक तणाव निर्माण करत आहे, असे भारताच्या दौर्यावर आलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अमीर खान मुत्तकी म्हणाले की, पाकिस्तानमधील बहुतांश लोक शांतताप्रिय आहेत आणि अफगाणिस्तानशी चांगले संबंध ठेवू इच्छितात. पाकिस्तानी नागरिकांशी आमचा कोणताही वाद नाही. पाकिस्तानमध्ये काही घटक आहेत जे तणाव निर्माण करत आहेत." पाकिस्तानच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देऊन अफगाणिस्तानने काल रात्री "आमचे लष्करी उद्दिष्टे" साध्य केले, असे त्यांनी सांगितले.
अफगाणिस्तान आपल्या सीमा आणि राष्ट्रीय हिताचे रक्षण करेल आणि म्हणूनच त्याने पाकिस्तानच्या आक्रमकतेला त्वरित प्रत्युत्तर दिले. आम्ही काल रात्री आमचे लष्करी उद्दिष्ट साध्य केले आणि आमचे मित्र, कतार आणि सौदी अरेबिया यांनी हा संघर्ष संपावा अशी इच्छा व्यक्त केली आहे, म्हणून आम्ही सध्या आमच्या बाजूने विराम घेतला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्हाला केवळ चांगले संबंध आणि शांतता हवी आहे," असेही अमीर खान मुत्तकी म्हणाले.
जेव्हा कोणी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सर्व नागरिक, सरकारचे प्रमुख, उलेमा आणि सर्व धार्मिक नेते देशाच्या हितासाठी लढण्यासाठी एकत्र येतात. अफगाणिस्तान गेली ४० वर्षे संघर्षात आहे... अफगाणिस्तान आता शेवटी मुक्त झाला आहे आणि शांततेसाठी कार्यरत आहे..जर पाकिस्तानला चांगले संबंध आणि शांतता नको असेल, तर अफगाणिस्तानकडे इतर पर्यायही आहेत," असे असेही अमीर खान मुत्तकी यांनी स्पष्ट केले.
मुत्तकी यांनी सांगितले की, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) अफगाणिस्तानात अस्तित्व नाही. अमेरिकेच्या पाठिंब्याने पाकिस्तानने या भागात कारवाई केली आहे. यामुळे अनेक आदिवासी लोकांचे विस्थापन झाले. अमेरिकेचे सैन्य आणि अमेरिकेने पाठिंबा दिलेल्या पूर्वीच्या सरकारने त्यांना अफगाण भूमीवर आश्रय दिला. ते विस्थापित भागातील पाकिस्तानी लोक आहेत आणि त्यांना निर्वासित म्हणून देशात राहण्याची परवानगी आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा, ड्युरंड लाईन, २,४०० किमी पेक्षा जास्त लांब आहे. त्यावर 'चंगेझ' किंवा 'अंग्रेज' कोणालाही नियंत्रण ठेवता आले नाही," असेही ते म्हणाले.
पाकिस्तानला शांतता हवी असेल, तर त्यांच्याकडे मोठी सेना आणि उत्तम गुप्तचर यंत्रणा आहे.ते त्याचे नियंत्रण का करत नाहीत? हा लढा पाकिस्तानच्या आत आहे. आमच्यावर दोषारोप करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या हद्दीतील समस्यांवर नियंत्रण ठेवावे. पाकिस्तान आपल्या लोकांना विश्वासात का घेत नाही? पाकिस्तानमधील अनेक लोक, आणि निश्चितच आम्हालाही, हा लढा सुरू राहावा असे वाटत नाही. परंतु पाकिस्तानने या गटांवर नियंत्रण मिळवावे. काही लोकांना खूश करण्यासाठी आपल्याच लोकांना धोक्यात घालायचा आहे का?, असा सवालही अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी केला.
गुरुवारी पाकिस्तानी हवाई हल्ल्यांनी अफगाण राजधानीला लक्ष्य केल्याचे अफगाणिस्तानने म्हटले. अफगाणिस्तानमधील महत्त्वाच्या सीमावर्ती चौक्या बंद करण्यात आल्या आहेत. अफगाणिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या सैन्याने रात्रभर केलेल्या सीमावर्ती कारवाईत ५८ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले, तर पाकिस्तानने ही संख्या २३ असल्याचे सांगितले आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, पाकिस्तान म्हणतो की त्यांच्या सुरक्षा दलांनी १९ अफगाण सीमा चौक्या ताब्यात घेतल्या आहेत.