

India-Afghanistan relations
नवी दिल्ली: अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमधील परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांचा भारत दौरा आता निश्चित झाला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) मुत्ताकी यांना या महत्त्वाच्या भेटीसाठी प्रवासाची सूट दिली आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर कोणत्याही तालिबानी नेत्याची ही पहिली भारत भेट असणार आहे. मुत्ताकी १० ऑक्टोबरला भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
दिल्याने मुत्ताकी हे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत. ही भेट अनेक प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मुत्ताकी यांच्या भारत भेटीवर पाकिस्तानने सुरुवातीला तीव्र आक्षेप घेतला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने अमेरिकेसोबत मिळून तालिबानी मंत्र्याच्या या दौऱ्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये विरोध केला होता. परिणामी, मुत्ताकी यांच्या भारत भेटीला आधी परवानगी मिळाली नव्हती. आता प्रश्न असा पडतो की, तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत दौऱ्याने पाकिस्तानला घाम का फुटला आहे?
खरतरं २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानमधील अशरफ गनी सरकार उलथवून सत्ता काबीज केल्यावर पाकिस्तानमध्ये जल्लोष करण्यात आला होता, कारण गनी सरकारचे भारतासोबतचे संबंध चांगले होते. पाकिस्तानला वाटले होते की, आता भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध बिघडतील. मात्र, झाले याच्या अगदी उलट. तालिबानचे संबंध पाकिस्तानशी बिघडत गेले आणि भारताशी मैत्री वाढत राहिली.
१. भारतासोबत तालिबानचे संबंध मजबूत होत असल्याने पाकिस्तान आपल्या प्रादेशिक स्थानाला थेट धोका असल्याचे मानतो. दुसरीकडे, तालिबान भारताशी संबंध सुधारून पाकिस्तानवरील आपली अवलंबिता कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
२. तालिबानने भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा अनेकदा निषेध केला आहे. मे २०२५ मध्ये काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा साधला होता, ज्यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे.
३. तालिबान सरकारने व्यापारासाठी इराणमधील चाबहार बंदराचा वापर करण्यामध्ये स्वारस्य दाखवले आहे. हा एक पर्यायी मार्ग असल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये इस्लामाबादचे आर्थिक महत्त्व कमी होण्याची भीती पाकिस्तानला आहे.
४. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या दहशतवाद्यांना तालिबान आश्रय देत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. तसेच, अफगाण निर्वासितांना पाकिस्तानने परत पाठवल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
५. तालिबान सध्या संतुलित परराष्ट्र धोरण अवलंबत आहे आणि भारताला अधिर प्राधान्य देत आहे. भारताने अफगाणिस्तानच्या जनतेला मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, औषधे आणि इतर मदत पुरवल्यामुळे हे संबंध अधिक मजबूत झाले आहेत.