माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंना आजन्म कॅबिनेट मंत्रिपद दर्जा; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय | पुढारी

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंना आजन्म कॅबिनेट मंत्रिपद दर्जा; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

पणजी; पुढारी वृत्तसेवा 

सत्तरीतील पर्ये मतदारसंघाचे विद्यमान आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी आमदार म्हणून 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांना राज्य सरकारने आजीवन कॅबिनेट दर्जा दिला आहे. आज, दि. 6 रोजी पर्वरीतील सचिवालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राणे हे मगो पक्षाच्या उमेदवारीवर पहिल्यांदा निवडून आल्यानंतर दयानंद बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात 1972 साली मंत्री झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सहा वेळा या पक्षाकडून मुख्यमंत्री झाले. आमदार, सभापती, विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. ते पहिल्यांदा वाळपई मतदारसंघातून व त्यानंतर मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर पर्ये मतदारसंघातून सलगपणे निवडून आले आहेत.

कारापूर कुळण येथे राहणारे प्रतापसिंह राणे यांना सत्तरीतील नागरिक साहेब म्हणून संबोधतात. हल्लीच त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त होण्याचा मनोदय व्यक्‍त केला आहे. त्यांचे पुत्र आरोग्यमंत्री विेशजित राणे हे त्याचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. प्रतापसिंह राणे यांनी 50 वर्षे राजकीय क्षेत्रात काम करताना सत्तरीसह गोव्याचा भरीव विकास केला. काँग्रेसमध्येच राहून सलगपणे निवडणुका जिंकल्या. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. हे त्यांच्या पारदर्शक राजकीय कारकिर्दीचे यश म्हणावे लागेल. त्यांच्या या सामाजिक व राजकीय सेवेची दखल घेऊन गोवा मंत्रिमंडळाने त्यांना आजीवन कॅबिनेट दर्जा बहाल केला आहे. 40 वर्षे सलगपणे आमदार राहणार्‍यांना हा बहुमान यापुढे मिळणार आहे.

सध्याच्या आमदारात फक्त दिगंबर कामत यांना हा बहुमान मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ निर्णयानुसार, राणे यांना कॅबिनेट दर्जासह कर्मचारी व सुरक्षा मिळणार आहे.

पक्षविरहित योग्य निर्णय ः तानावडे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, प्रतापसिंह राणे हे काँग्रेसचे आमदार आहेत, तरी गोव्यासाठी ते आदरणीय आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या गोवा सरकारने पक्षाचा विचार न करता राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे. भाजप पक्ष हा नेहमीच सर्वांची नोंद घेतो व त्यांचा सन्मान राखतो. गेल्या सात वर्षांतील पद्मश्री व इतर पुरस्कार पाहिल्यास
त्याचा प्रत्यय येतो. आपण भाजपतर्फे प्रतापसिंह राणे यांचे अभिनंदन करत असून, चांगला निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचेही अभिनंदन करत आहे.

मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे आभार

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले की, आपले वडील प्रतापसिंह राणे यांनी 50 वर्षे गोव्याची सेवा केली. आमदार, मुख्यमंत्री, सभापती, विरोधी पक्षनेते अशा स्वरूपात काम केले. सत्तरीसह गोव्याचा विकास केला. त्यांच्या निःस्वार्थी कार्याची दखल घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळात हा ठराव मांडून तो संमत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे आपण आभार व्यक्‍त करत आहे. हा सन्मान
आमचा आहेच; पण तो सत्तरी व उसगावच्या लोकांचा आहे. त्यामुळे त्यांच्यातर्फे आपण सरकारचे आभार व्यक्‍त करत आहे.

Back to top button