मुकेश अंबानी मोठ्या निर्णयाच्या तयारीत; रिलायन्सला लवकरच नवीन बॉस मिळणार ? | पुढारी

मुकेश अंबानी मोठ्या निर्णयाच्या तयारीत; रिलायन्सला लवकरच नवीन बॉस मिळणार ?

मुंबई, पुढारी ऑनलाईन

Reliance Industries Chairman  मुकेश अंबानी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सोडणार असल्याचे सूतोवाच केले आहेत. आपला उत्तराधिकारी नेमण्याबाबत त्यांनी केलेले विधान यासाठी महत्त्वाचे असून कंपनीची धुरा सांभाळण्यास तरुण पिढी सक्षम असून ते नेतृत्वाची भूमिका स्वीकारतील असे ते म्हणाले. रिलयान्स समुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त कंपनीच्या फॅमिली डे कार्यक्रमात बोलताना त्यांनी या प्रक्रियेला गती मिळावी अशी इच्छाही व्यक्त केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ तरुण पिढीला आम्ही मार्गदर्शन केले पाहिजे, त्यांना सक्षम केले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांनी आमच्यापेक्षा चांगले काम केल्यास शांत बसून टाळ्या वाजवल्या पाहिजेत.’

६४ वर्षीय मुकेश अंबानी यांनी धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर २००२ मध्ये रिलायन्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्षपद स्वीकारले. तत्पूर्वी मुकेश आणि अनिल या दोन भावांमध्ये समुहातील विविध कंपन्यांच्या मालकीवरून वाद झाले होते. मात्र, कालांतराने ते मिटविण्यात आले. अनिल यांच्या वाट्याला गेलेल्या अनेक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. मात्र, मुकेश यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांची घोडदौड सुरू आहे. मुकेश यांना आकाश, ईशा आणि अनंत अशी तीन मुले आहेत. रिलायन्स इंडिया लिमिटेड दूरसंचार, किरकोळ आणि ऊर्जा व्यवसायात गुंतलेली आहेत. त्यांची तीनही मुले समुहाच्या संचालक मंडळावर नाहीत. मात्र, कंपनीच्या प्रमुख शाखांमध्ये संचालक आहेत.

फॅमिली डे कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, ‘मला यात शंका नाही की आकाश, ईशा आणि अनंत हे पुढच्या पिढीचे नेतृत्व म्हणून रिलायन्सला आणखी उंचीवर नेतील. रिलायन्सच्या प्रगतीसाठी त्यांची कटिबद्धता, वचनबद्धता आणि निष्ठा मी दररोज पाहू आणि अनुभवू शकतो. लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आणि भारताच्या विकासात योगदान देण्यासाठी माझ्या वडिलांचे ध्येय आणि क्षमता मला त्यांच्यामध्ये दिसते.’

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुढे म्हणाले , ‘मोठ्या संधीचा फायदा घेऊन आरआयएलच्या भविष्यातील वाढीचा पाया घालण्याची वेळ आली आहे. कापड कंपनी म्हणून सुरू झालेली रिलायन्स इंडिया लिमिटेड विविध व्यावसायिक हितसंबंध असलेल्या समुहात रूपांतरित झाली. या कंपनीची उत्पादने दररोज लोकांच्या जीवनाशी संबधित आहेत. आम्ही आमचा ऊर्जा व्यवसाय पूर्णपणे री-इंजिनियर केला आहे. आता, रिलायन्स स्वच्छ आणि हरित ऊर्जा आणि सामग्रीमध्ये जगात आघाडीवर आहे.

किरकोळ आणि जिओ व्यवसायांबद्दल, अंबानी म्हणाले, ‘गेल्या एका वर्षात, आम्ही जवळपास १० लाख लहान दुकानदारांना ऑनबोर्ड केले आहे. जवळपास एक लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. जिओने १२० दशलक्षाहून अधिक ग्राहक मिळवले.

हेही वाचा : 

Back to top button