

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ८व्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. यावेळी देखील कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न फिटमेंट फॅक्टर हाच आहे, कारण तो एकूण पगारवाढ ठरवतो. अनेकांना उत्सुकता आहे की, यावेळेस पगार खरोखरच दुप्पट होऊ शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि फिटमेंट फॅक्टरचे संपूर्ण गणित जाणून घ्या.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्राला मंजुरी दिली आहे. आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाला शिफारशी सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आता आयोग पुढील १८ महिन्यांमध्ये आपला सविस्तर अहवाल तयार करून सरकारला सादर करेल. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर शिफारसी लागू होतील. या शिफारशींचा लाभ ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे ६९ लाख पेन्शनधारकांना होऊन त्यांच्या वेतनासह विविध भत्त्यांमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, फिटमेंट फॅक्टर म्हणजे असा गुणांक, ज्याद्वारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि पेन्शन वाढवली जाते. किती फिटमेंट फॅक्टर ठेवायचा याचा निर्णय हा आयोग घेणार असून, त्याच्या आधारे मूळ वेतन निश्चित केले जाणार आहे. सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर २.५७ होता. ८व्या वेतन आयोगात हा आकडा काय असेल, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. परंतु, हा फॅक्टर जितका जास्त असेल, कर्मचाऱ्यांच्या वेतनात तितकी मोठी वाढ होणार हे निश्चित आहे.
उदाहरणार्थ, ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉयीज फेडरेशनचे अध्यक्ष मंजीत सिंह पटेल यांच्या माहितीनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ३५ हजार रूपये असेल आणि नवीन फिटमेंट फॅक्टर २.११ निश्चित झाला, तर नवीन मूळ पगार ७३ हजार ८५० (३५००० × २.११) इतका होईल. याच वाढलेल्या मूळ पगाराच्या आधारावर घरभाडे भत्ता यांसारखे अन्य भत्ते देखील वाढतात. तज्ज्ञांच्या मते, घरभाडे भत्ता लगेच वाढतो, तर वाहतूक भत्त्यासारखे निश्चित भत्ते काही महिन्यांनी सुधारित केले जातात.
महागाई भत्ता (DA) थेट फिटमेंट फॅक्टर निश्चित करत नसला तरी, तो एक महत्त्वाचा घटक ठरतो. जर सध्याचा महागाई भत्ता ५८ टक्के असेल आणि तो लागू होईपर्यंत ७० टक्यापर्यंत पोहोचला, तर ग्रोथ फॅक्टर आणि फॅमिली युनिट्स यांसारख्या घटकांचा विचार करून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
फिटमेंट फॅक्टरचा बेसिक आणि एचआरएवर परिणाम होतो, परंतु नवीन वेतन आयोग (8th Pay Commission) लागू झाल्यानंतर डीए शून्यावर रीसेट केला जातो. म्हणून, एकूण प्रत्यक्ष पगार वाढ साधारणपणे २०-२५% असते. जर फिटमेंट फॅक्टर २.० असेल, तर ५०,००० मूळ पगार १,००,००० होईल. याचा अर्थ असा नाही की पगार दुप्पट होईल.
पगारवाढीप्रमाणेच, पेन्शनधारकांच्या मूळ पेन्शनमध्येही त्याच फॅक्टरने वाढ होईल. जर एखाद्या निवृत्त व्यक्तीला ३० हजार पेन्शन मिळत असेल आणि फॅक्टर २.० निश्चित झाला, तर त्यांची नवीन पेन्शन ६० हजार पर्यंत वाढू शकते.
७ व्या वेतन आयोगाने सर्व स्तरांवर एकसमान २.५७ फॅक्टर लागू केला. यावेळी वेतनातील तफावत कमी करण्यासाठी कनिष्ठ स्तरातील कर्मचाऱ्यांना थोडा जास्त फॅक्टर लागू होण्याची शक्यता आहे. सध्या, केंद्र सरकारमध्ये १८ वेतन स्तर आहेत. काही स्तरांचे विलीनीकरण देखील केले जाऊ शकते. (8th Pay Commission)