

Chandigarh dog ban
चंदीगड: चंदीगड महानगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अमेरिकन बुलडॉग, अमेरिकन पिटबुल आणि बुल टेरियरसह सहा आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घातली आहे. महानगरपालिकेने 'द म्युनिसिपल कॉर्पोरेशन चंदीगड पेट अँड कम्युनिटी डॉग्स बाय-लॉज, २०२५' लागू केले आहेत. पाळीव श्वान पाळणाऱ्यांसाठीही अनेक कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
मात्र, ज्यांच्याकडे यापैकी कोणत्याही जातीचे श्वान आधीपासूनच आहेत, त्यांना ही बंदी लागू होणार नाही, असे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.
जनतेला धोकादायक ठरणाऱ्या आणि आक्रमक प्रवृत्तीच्या या सहा प्रजातींची नोंदणी किंवा त्यांना पाळण्यास चंदीगड महानगरपालिकेच्या हद्दीत बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिकन बुलडॉग (American Bulldog)
अमेरिकन पिटबुल (American Pitbull)
बुल टेरियर (Bull Terrier)
केन कोर्सो (Cane Corso)
डोगो अर्जेंटिनो (Dogo Argentino)
रॉटविलर (Rottweiler)
नवीन अधिनियमानुसार, श्वानांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे बंदी असलेल्या जातीचे श्वान आधीपासून आहेत, त्यांना नोंदणीसाठी ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीनंतर बंदी असलेल्या श्वानांना पाळताना, प्रजनन करताना किंवा त्यांना आश्रय देताना आढळल्यास, मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, तसेच अधिकृत अधिकाऱ्यांकडून श्वान तात्काळ जप्त केले जातील.