पुढारी ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण महिलांसाठी एक अनोखी भेट दिली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक अडचणीवेळी पाच हजार रुपयांची ओव्हरड्राफ्टची सुविधा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना इतरांकडे मदत मागण्याची वेळ येणार नाही.
केंद्र सरकारच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने ही भेट जाहीर केली आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत अटी शर्तींची पूर्तता असणाऱ्या तसेच महिला बचत गटाशी संबंधित ग्रामीण भागातील महिलांसाठी ही सुविधा जाहीर करण्यात आली आहे.
ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर करून, महिला त्यांच्या बँक खात्यातील रकमेपेक्षा पाच हजार रूपये जास्त काढू शकणार आहेत. तसे बघायला गेले तर बँकेच्यावतीने मोठ्या ग्राहकांनाच अशी सुविधा दिली जाते. मात्र आता गावातील महिलांनाही ही सुविधा मिळणार आहे.
शनिवार १८ डिसेंबर रोजी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) अंतर्गत या योजनेचा प्रारंभ झाला आहे.
अर्थमंत्र्यांनी २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय भाषणात या ओव्हरड्राफ्ट सुविधेला परवानगी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, देशातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या सदस्यांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा उद्देश आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यात मदत करणे हा असून अंदाजे ५ कोटी महिलांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
हेही वाचलं का?