सातारा ; पुढारी वृत्तसेवा : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. विशेष म्हणजे, या राजकीय गदारोळात प्रमुख पक्ष बाजूला पडले असून, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले व भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यातच कलगीतुरा रंगला आहे. शिवेंद्रराजेंनी काही दिवसांपूर्वी केलेल्या कडवट टीकेला उदयनराजे यांनी आता आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. (udayanraje vs shivendraraje)
सातारा शहरात सध्या 'नारळफोड्या गँग' फिरत आहे, अशी बोचरी टीका शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांचं नाव न घेता केली होती. या टीकेला उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलंय. 'आम्ही नारळ वाढवून लोकांची चांगली कामं करतो, मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायचं काम केलंय,' असा पलटवार उदयनराजेंनी केला आहे.
'जिल्ह्यातील लोकांनी विश्वास ठेवत तुमच्या बँकांमध्ये पैसे ठेवले. मात्र त्यांना फसवत तुम्ही त्यांचीच घरं फोडायची कामं केलीत.अशा पद्धतीनं लोकांची घर फोडण्यापेक्षा नारळ फोडून विकासकामं करणारी आमची गँग चांगली, असा टोला उदयनराजेंनी हाणला आहे.
'वय वाढल्यामुळं शिवेंद्रराजेंची बुद्धी सुद्धा लहान मुलाच्या बुद्धीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळंच त्यांनी आमच्यावर असा आरोप केला आहे. वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं हे मला पटत नाही. हे लोक अत्यंत संकुचित वृत्तीचे आहेत. त्यांनी आरोप करताना विचार करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
लोकांची आमच्याकडूनच कामांची अपेक्षा आहे. त्यामुळंच आम्ही कामांचे नारळ फोडतोय, असंही उदयनराजे म्हणाले. राजकारणात हेल्दी कम्पिटिशन पाहिजे, ती त्यांनी जरूर करावी; पण असे आरोप करताना थोडं भान ठेवलं पाहीजे, असंही त्यांनी शिवेंद्रराजेंना सुनावलं.
सातारा नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी शिवेंद्रराजे अटोकाट प्रयत्न करत आहेत. उदयनराजेंनीही नगरपालिकेच्या कामांच्या माध्यमातून लोकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवून पुन्हा जनतेचा कौल मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात कोणाची सरशी होते याविषयी उत्सुकता आहे.
हेही वाचलं का?