कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नागरी वस्तीत शिरलेल्या वन्यप्राण्यांच्या व्यवस्थापनासाठी महसूल आणि पोलिस विभागांची मदत घेतली जाईल. त्याकरिता दोन्ही विभागांशी समन्वय ठेवा, अशा सूचना राज्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी सोमवारी अधिकार्यांना दिल्या. दोन दिवसांत प्राणी व्यवस्थापनाबाबत कार्यशाळाही आयोजित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून गवा धुमाकूळ घालत आहे. गव्याने केलेल्या हल्ल्यात एका युवकाचा बळी गेला. दोघेजण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य वनसंरक्षक लिमये आज कोल्हापुरात आले. त्यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली.
लिमये यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नागरी वस्तीत वन्यप्राणी शिरणे ही एकप्रकारची आपत्तीच आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, असे लिमये यांनी सांगितले. वन्यप्राणी शिरलेल्या ठिकाणी तातडीने पोलिस बंदोबस्त पाठवणे आवश्यक आहे. गरज पडल्यास परिसरात कलम 144 लागू करावे. यावेळी महसूल विभागाच्या यंत्रणेचा सहभाग आवश्यक असतो. पोलिस आणि महसूल विभागांच्या मदतीने वन विभागाला पुढील काम गतीने करणे शक्य होते, असेही लिमये यांनी सांगितले.
गेले तीन दिवस गवा कोल्हापूर परिसरात फिरत आहे. असे प्रकार यापूर्वीही झाले आहेत. अशा परिस्थितीत काय करावे, काय करू नये, याबाबत वन विभागासह पोलिस, महसूल यासह विविध स्वयंसेवी संस्थांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. प्रत्येक गावातील पोलिसपाटील यांच्यासह स्थानिक यंत्रणांचाही वन विभागाशी कायमचा संपर्क राहील, याद़ृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
गव्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या
नागरी वस्तीत गवा शिरण्याचे प्रकार यापुढेही होतील. अशा परिस्थितीत गव्याला त्याचा मार्गाने जाऊ देणे आवश्यक असते. त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक लिमये यांनी केले. गवा हा शांत प्राणी आहे. तो स्वत:हून हल्ला करत नाही, तो आक्रमक होईल, बिथरेल, असे कोणतेही कृत्य करू नका. गव्यामुळे झालेल्या नुकसानींची तत्काळ भरपाई दिली जाते. यामुळे पिकांचे, इमारत अथवा अन्य साहित्याचे नुकसान झालेच, तर त्याची भरपाई मिळेलच; पण ते वाचवण्याच्या प्रयत्नात स्वत:चा जीव धोक्यात घालू नका.