Corona patients : डेल्टा डेरिव्हेटिव्हचे ८९ टक्के तर, डेल्टा व्हेरियंटचे ११ टक्के रुग्ण | पुढारी

Corona patients : डेल्टा डेरिव्हेटिव्हचे ८९ टक्के तर, डेल्टा व्हेरियंटचे ११ टक्के रुग्ण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिकेकड़ून कोविड- १९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या मुंबईतील २२१ रुग्णांमधील नमुन्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात डेल्टा व्हेरियंटचे २४ रुग्ण रुग्ण (११ टक्के) तर डेल्टा डेरिव्हेटिव्हचे १९५ रुग्ण (८९ टक्के) रुग्ण आढळले आहेत. (Corona patients)

डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत डेल्टा डेरिव्हेटिव्ह विषाणूचा संसर्ग वेग कमी असल्याचे आढळून आले आहे. ओमायक्रॉन या नवीन व्हेरियंटचे २ रुग्ण यापूर्वीच आढळून आले आहेत. नमुने संकलित केलेल्या २२१ पैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने या पाचव्या जनुकीय चाचणीत कोरोनाबाधित एकूण २७७ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २२१ रुग्ण हे मुंबई महानगरातील आहेत. चाचणीचे निष्कर्ष पाहता, कोविड लसीकरण वेगाने केल्याने मुंबई महानगरातील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे.

मात्र, नवीन ओमायक्रॉन विषाणू प्रकाराचा वेगाने प्रसार होण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला इशारा लक्षात घेता, सर्वांनी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन यापुढेही कठोरपणे करणे आवश्यक आहे. (Corona patients)

मुंबईतील २२१ रुग्णांपैकी १९ रुग्ण (९ टक्के) हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ६९ रुग्ण (३१ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ७३ रूग्ण (३३ टक्के), ६१ ते ८० वयोगटात ५४ रुग्ण (२५ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ६ रुग्ण (३ टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत. लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण १० टक्केपेक्षा कमी आहे.

लसीकरण केल्याचा होतोय फायदा

कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास २२१ पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त एका रुग्णाला तर दोन्ही डोस घेतलेल्या अवघ्या २६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

लसीचा एकही डोस न घेतलेल्या ४७ पैकी १२ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या २२१ पैकी कोणाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही सर्वाधिक दिलासादायक बाब आहे.

लस घेणाऱ्यांना विषाणू बाधेपासून सर्वाधिक संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता पूर्णपणे रोखता येते. तर लस न घेतलेल्यांना कोविड बाधेपासून तीव्र धोका संभवतो, हा वैद्यकीय इशारा लक्षात घेता सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करुन घेणे आवश्यकच आहे.

हेही वाचा

Back to top button