कोल्हापूर जिल्हा बॅंक निवडणूक : स्वीकृतचे हुकमी डाव टाकत बिनविरोधची मोहीम

कोल्हापूर जिल्हा बॅंक निवडणूक : स्वीकृतचे हुकमी डाव टाकत बिनविरोधची मोहीम
Published on
Updated on

कोल्हापूर; संतोष पाटील : जिल्हा बँक निवडणूक (district bank election) बिनविरोध करताना नव्या चेहर्‍यांना संधी देण्यास कमी स्पेस आहे. काटाजोड लढतीत नेत्यांकडून 'स्वीकृत'चे रामबाण आयुध बाहेर काढले जात आहे. तडजोडीच्या राजकारणात गोकुळ दूध संघाच्या दोन स्वीकृत संचालकपदाचे राजकीय मोलही या निमित्ताने जोखले जाईल. जिल्हा बँक आणि गोकुळ संघ अशा चार स्वीकृत संचालकपदाचा हुकमी डाव खेळत बिनविरोधाची मोहीम फत्ते करण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांपैकी संस्था गटातील 12 जागांवर तालुक्यात आपल्या ताकदीवर लढायची तयारी ठेवायची. तत्पूर्वी, अर्ज दाखल करतानाच मतदारांची ओळखपरेड करून समोरच्यावर हबकी डाव टाकायचा, अशी रणनीती आघाडीप्रमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच आखली. पालकमंत्री सतेज पाटील बिनविरोध झाले. एका उमेदवाराची माघार झाल्यास आ. पी. एन. पाटील पुन्हा बिनविरोध होतील. दरम्यान, 251 पैकी 235 ठरावधारक आपल्या बाजूने असल्याचा ठोस दावा आ. पी. एन. पाटील यांनी केला आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची सर्वपक्षीय आघाडी झाल्यास बिनविरोधाची वाट सोपी होईल. खा. संजय मंडलिक, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, आ. राजेश पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक किंवा अमल महाडिक, ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने आदी दिग्गजांची निवडणूक सोपी असल्याचे बोलले जाते. (district bank election)

शिरोळमधून मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर किंवा गणपतराव पाटील दोघांपैकी एकजण स्वीकृत होईल. राजू शेट्टी यांच्या माघारीनंतर समर्थकाला जिल्हा बँकेची उमेदवारी किंवा 'गोकुळ'च्या स्वीकृत संचालक पदाबाबत चर्चेअंती निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघ असे एकूण चार स्वीकृत संचालकपदाचे हुकमी पत्ते नेत्यांच्या हातात आहेत.

या जोरावर बँकेच्या चार जागांचा तिढा सोडवणे नेत्यांना सहज शक्य होणार आहे. काटाजोड लढती असलेल्या ठिकाणीच स्वीकृतची रामबाण मात्रा वापरली जाईल. अन्यथा स्वीकृत संचालक पदाच्या आशेवरच काही डझन उमेदवारांना रिंगणातून माघार घेणे भाग पाडले जाईल.

मधाचे बोट..! (district bank election)

तालुक्यातील नेत्यांना आमदारकीचे आमिष, तर दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना स्वीकृत संचालक, जिल्हा परिषद, नगरपालिका, साखर कारखाना संचालकपदाचे मधाचे बोट लावले जाईल. संस्थेची नवी इमारत बांधणे, डागडुजी करणे, गोकुळ आणि जिल्हा बँकेत नोकर भरतीत संधी, गावातील सोसायटीपासून कारखान्यात संचालकपदाच्या ऑफरसह पंचायत समिती निवडणुकीत पाठिंब्याचा शब्द दुसर्‍या फळीतील नेत्यांना दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news