नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि लहान घटक पक्ष सरकार चालवित आहे. हा 'मिनी यूपीए'चा क्रांतिकारक प्रयोग आहे. देशात याची चर्चा सुरू आहे, असे मत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेतून व्यक्त केले. पंरतु, शिवसेना आणि यूपीए बद्दल उत्तर देणे त्यांनी टाळले. शिवसेना यूपीएत जाणार का? यासंबंधी २४ तासांची मुदत दिली होती. यातील १२ तास अद्यापही शिल्लक आहे, अशी गुगली टाकत राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेचा यूपीएतील प्रवेशासंबंधी 'सस्पेन्स' कायम ठेवले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी नेहमी भेट होत असते. महाराष्ट्राच्या घडामोडीसंदर्भात राहुल गांधी भेट घेत असतात. प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेट होत आहे. प्रियंका गांधी काँग्रेसच्या महासचिव आहेत, त्यामुळे त्यांना भेटायला काही हरकत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी स्पष्ट केले. प्रियंका गांधी यांनी भेटायची इच्छा व्यक्त केल्यानंतर यासंबंधी पक्षनेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार त्यांना भेटणार असल्याचे राऊत म्हणाले. प्रियंका गांधी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आहेत. निर्णय प्रक्रियेत त्या सहभागी असतात. अशात त्यांना एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर त्यांना भेटणे आम्हचे कर्तव्य असल्याचे राऊत म्हणाले.
राहुल गांधी यांच्या भेटीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. यूपीए अधिक बळकट व्हावी, असे सर्वांचीच इच्छा आहे. राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला असल्यास शरद पवार यांनी पुढाकार घेऊ नये, असे नाही. शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता देशात नाही. देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी, अशी आमची आणि शरद पवार यांची भूमिका असल्याचे राऊत म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विधान नैराश्यातून येतात. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.