पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि.२०) काही प्रमाणात अस्थिरता दिसून आली. सपाट पातळीवर खुले झालेले सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty 50) वाढून बंद झाले. खासगी बँकिंग आणि हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समधील तेजीमुळे सलग सहाव्या सत्रात सेन्सेक्स वाढीला चालना मिळाली. सेन्सेक्स १४१ अंकांनी वाढून ७७,४७८ वर बंद झाला. तर निफ्टी ५१ अंकांच्या किरकोळ वाढीसह २३,५६७ वर स्थिरावला.
ऑटो, फार्मा आणि पीएसयू बँकिंग शेअर्समध्ये विक्री दिसून आली. तर मेटल, कॅपिटल गुड्स, रियल्टी, ऑईल आणि गॅस क्षेत्रात खरेदीवर जोर राहिला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढला. तर स्मॉलकॅपमध्ये १ टक्के वाढून बंद झाला.
रिलायन्स आणि बँकिग क्षेत्रातील हेवीवेट शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स, कोटक बँक, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, ॲक्सिस बँक हे शेअर्स सर्वाधिक वाढले. रिलायन्सचा शेअर्स आज १ टक्के वाढून २,९६४ रुपयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर तो २,९५० रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. तर सन फार्मा, एम अँड एम, विप्रो, एनटीपीसी, भारती एअरटेल, एसबीआय हे शेअर्स घसरले.
निफ्टीवर काय स्थिती?
निफ्टी आज २३,५८६ वर खुला झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात त्याने २३,६२४ च्या अंकाला स्पर्श केला. त्यानंतर निफ्टी २३,५०० च्या वर स्थिरावला. निफ्टी ५० वर हिंदाल्को, ग्रासीम, जेएसडब्ल्यू स्टील, बीपीसीएल, अदानी पोर्टस् हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर हिरो मोटोकॉर्प, सन फार्मा, एम अँड एम, विप्रो, एनटीपीसी हे शेअर्स टॉप लूजर्स होते.
भारतीय रुपया गुरुवारी निचांकी पातळीवर घसरला. आज भारतीय रुपया प्रति डॉलर ८३.६४ च्या निचांकी पातळीवर बंद झाला. याआधीच्या सत्रात रुपया ८३.४५ वर बंद झाला होता. स्थानिक आयातदारांकडून डॉलरची मागणी मजबूत राहिल्याने रुपयावर दबाव राहिला आहे.
हे ही वाचा :