अर्थवार्ता

अर्थवार्ता

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 175.45 अंक व 299.41 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 23465.6 अंक व 76992.77 अंकांच्या पातळीवर म्हणजेच आजपर्यंतच्या सर्वोच्च विक्रमी पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये एकूण 0.75 टक्क्यांची, तर सेन्सेक्समध्ये 0.39 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. लोकसभेचे निकाल लागल्याच्या सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्सने खूप मोठ्या प्रमाणात चढ-उतार नोंदवले. परंतु, या सप्ताहात स्थिर सरकार बनत असल्याची शाश्वती गुंतवणूकदारांना मिळाली. मंत्रिमंडळाचेदेखील खाते वाटप झाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढीस लागला. याची परिणिती सेन्सेक्स व निफ्टीच्या सर्वोच्च पातळीवर झेप घेण्याकडे झाली.

सप्ताहादरम्यान सर्वाधिक वाढ झालेल्या समभागांमध्ये श्रीराम फायनान्स (9.4 टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (7.5 टक्के), एचडीएफसी लाईफ (6.3 टक्के), सिप्ला (4.5 टक्के), भारत पेट्रोलियम (4.5 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये एचयूएल (-3.8 टक्के), इन्फोसिस (-2.9 टक्के), कोटक महिंद्रा (-2.1 टक्के), टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट (-2.0 टक्के), आयटीसी (-1.8 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे (बीएसई) भांडवल बाजारमूल्य 14 जून रोजी संपलेल्या सप्ताहात आजपर्यंतच्या सर्वोच्च विक्रमी किमतीवर म्हणजेच 435 लाख कोटींवर पोहोचले. एका सप्ताहात भांडवल बाजारमूल्यात सुमारे 11.5 लाख कोटींची भर पडली.

* भारताचा घाऊक महागाई दर मे महिन्यात मागील 15 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच 2.61 टक्क्यांवर पोहोचला. त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दर म्हणजेच रिटेल इन्फ्लेशन मागील 12 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 4.75 टक्क्यांपर्यंत खाली आला. अन्नधान्य महागाई दर याच काळात 8.69 टक्क्यांवर स्थिर राहिला. देशाच्या औद्योगिक उत्पादनाची प्रगती दर्शवणारा निर्देशांक इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रॉडक्शन एप्रिल महिन्यात मागील तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 5 टक्क्यांवर खाली आला.

* बजाज उद्योग समूहाची गृह कर्ज वितरण क्षेत्रातील कंपनी बजाज हौसिंग फायनान्स लवकरच 7 हजार कोटींचा आयपीओ भांडवल बाजारात आणणार. यामध्ये 3 हजार कोटींचे ऑफर फॉर सेल समभाग (ओएफएस) असून 4 हजार कोटींचे नवे समभाग (फेश इश्यू) सामान्य गुंतवणूकदारांसाठी जारी केले जाणार आहेत. बजाज हौसिंग फायनान्सचे व्यवस्थापनअंतर्गत भांडवल मूल्य (एयूएम) 31 मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात मागील वर्षीच्या तुलनेत 32 टक्के वधारून 91,370 कोटी इतके झाले.

* ह्युंदाई मोटर्स इंडिया कंपनी आयपीओच्या माध्यमातून सुमारे 3 अब्ज डॉलर्सचा म्हणजेच 18 ते 19 हजार कोटींचा निधी उभा करणार. असे झाल्यास हा भारतातील आजपर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरेल. यापूर्वी एलआयसीने 2.5 अब्ज डॉलर्सचा आयपीओ बाजारात आणला होता. ह्युंदाई मोटर्स इंडिया आयपीओद्वारे 15 ते 20 टक्के हिस्सा विक्री करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आयपीओचा आकार बघता ह्युंदाई मोटर्स इंडियाचे बाजारमूल्य सुमारे 18 ते 20 अब्ज डॉलर्सच्या दरम्यान असल्याचे विश्लेषकांचे मत.

* व्होडाफोन उद्योग समूह आपला इंडस टॉवर्समधील संपूर्ण 2.3 अब्ज डॉलर्सचा हिस्सा विक्री करण्याच्या तयारीत. इंडस टॉवर्समध्ये व्होडाफोनचा सुमारे 21.5 टक्के हिस्सा आहे. इंडस टॉवर्स ही दूरसंचार कंपन्यांना टार्क्सची सुविधा पुरवते. यापूर्वी 2022 मध्ये व्होडाफोन कंपनीने स्वतःचा इंडस टॉवर्समधील संपूर्ण म्हणजेच त्यावेळेला असलेला 28 टक्के हिस्सा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, या संपूर्ण हिस्स्याची विक्री करण्यात कंपनीला यश मिळाले नव्हते. व्होडाफोन- आयडियावर असलेले 42.17 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडण्यासाठी या विक्रीतून आलेल्या रकमेचा वापर करण्यात येणार आहे.

* मे महिन्यात भारताची निर्यात 9.1 टक्क्यांनी वधारून 38.13 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. तसेच आयात 7.6 टक्के वधारून 61.91 अब्ज डॉलर्सवर पोहोचून व्यापार तूट 23.78 अब्ज डॉलर्सवर गेली. मागील वर्षीच्या ऑक्टोबरनंतरची ही सर्वात मोठी व्यापार तूट आहे.

* अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट कंपनीने दक्षिण भारतातील पेन्ना सिमेंट ला 10,422 कोटींना खरेदी केले. या व्यवहारामुळे अदानी उद्योग समूहाची सिमेंट उत्पादक क्षमता प्रतिवर्ष 14 दशलक्ष टनांनी वधारेल. सध्या अदानी समूहाकडे एसीसी आणि अंबुजा सिमेंट या दोन कंपन्या आहेत. या दोन कंपन्यांची एकूण सिमेंट उत्पादन क्षमता 89 दक्षलक्ष टन इतकी आहे. 2028 पर्यंत अदानी समूहाने प्रतिवर्ष 140 दशलक्ष टन सिमेंट उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे.

* 2012 ते 2015 दरम्यान घेतलेल्या ध्वनीलहरींच्या (स्पेक्ट्रम) बदल्यात आकारल्या जाणार्‍या सरकारी करांची परतफेड (स्पेकड्युज) एअरटेलने मुदतीआधी केली. यासाठी एअरटेलने एकूण 7904 कोटी मोजले. यामुळे थकीत करांपोटी मोजावे लागणारे 9.75 ते 10 टक्क्यांचे व्याज बचत होणार आहे.

* एसबीआय म्युच्युअंल फंडाचा नवा विक्रम. व्यवस्थापनांतर्गत भांडवलमूल्याच्या द़ृष्टीने (Asset Under Management) 10 लाख कोटींवर पोहोचणारे देशातील पहिले म्युच्युअल फंड घराणे. 2021 ते 2024 या वर्षात एसबीआय म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनांतर्गत भांडवलमूल्यात चक्रवाढ व्याज दराने 27 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. एकूण 116 योजनांसह एसबीआय म्युच्युअल फंड देशातील सर्वात मोठे म्युच्युअल फंड घराणे (Mutual Fund House) ठरले आहे.

* टाटा समूह स्मार्ट फोन उत्पादनात उतरण्याच्या तयारीत. यासाठी चीनच्या व्हिवो इंडिया कंपनीशी टाटा समूहाची बोलणी सुरू. या कंपनीतील 51 टक्के हिस्सा टाटा खरेदी करणार. भारतात विक्री होणार्‍या किंवा तयार होणार्‍या कोणत्याही चिनी मोबाईल उत्पादक कंपनीत भारतीय कंपनीचा 51 टक्के हिस्सा असावा अशी सुरक्षिततेच्या द़ृष्टीने केंद्राची भूमिका आहे. याद़ृष्टीने टाटा समूहाचे प्रयत्न सुरू आहेत.

* सरकारी कंपनी बीपीसीएलचे (भारत पेट्रोलियम) खासगीकरण करण्यात सध्या कोणताही विचार नसल्याचे नवनिर्वाचित केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले. आर्थिक वर्ष 2022 मध्ये एअरइंडियासह बीपीसीएलचादेखील खासगीकरणाचा विचार होता; परंतु आता तो मागे पडल्याचे स्पष्ट होते. सरकारला तेल व नैसर्गिक वायू उद्योगातून एकूण महसुलापैकी सुमारे 20 टक्के महसूल मिळतो. लवकरच या खनिज तेलाचे उत्पादन 45 हजार बॅरल प्रतिदिनपर्यंत वाढवले जाणार असल्याचे प्रतिपादन हरदीपसिंग यांनी केले. आर्थिक वर्ष 2024 मध्ये बीपीसीएलने 19 हजार कोटी रुपये नफा कमावला.

* 7 जून रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय चलन गंगाजळी पुन्हा 4.3 अब्ज डॉलर्सनी वधारून विक्रमी पातळीवर म्हणजेच 655.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news