नीट घोटाळा : एका पेपरचा दर ३० लाख रुपये; पोस्ट डेटेड ६ चेक हस्तगत

नीट घोटाळा : एका पेपरचा दर ३० लाख रुपये; पोस्ट डेटेड ६ चेक हस्तगत

पाटणा : वृत्तसंस्था : पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कथित नीट-यूजी २०२४ पेपरफुटी प्रकरणात १३ जणांना अटक केली होती. यापैकी काही आरोपी नीट परीक्षेपूर्वी पेपर हवा असलेल्यांकडून प्रत्येकी ३० लाख रुपयांची मागणी करत होते. ही बाब सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावा म्हणून यासंदर्भात देण्यात आलेले पुढच्या तारखेचे (पोस्ट डेटेड) धनादेश पोलिसांनी हस्तगत केले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मिळविलेले हे मोठे यश मानले जात आहे.

पेपरफुटीमागे असलेल्या टोळीसाठी देण्यात आलेले हे धनादेश आहेत. गेल्या महिन्यात आयोजित नीट परीक्षेपूर्वी कथितरीत्या फुटलेल्या पेपरची मागणी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडून ३० लाख रुपये वा त्याहून अधिक रकमेची वसुली करू पाहात होते. आर्थिक गुन्हे शाखेचे उपमहानिरीक्षक मानवजीत सिंह ढिल्लो यांनी सांगितले की, तपासादरम्यान आम्ही हस्तगत केलेले धनादेश ज्यांनी परीक्षेपूर्वी उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली होती, त्यांची नावे जारी केली आहेत. आम्ही संबंधित बँकेतून खातेधारकांची माहिती मिळवत आहोत, असेही ते म्हणाले.

आजअखेर या प्रकरणात ४ परीक्षार्थी व त्यांच्या कुटुंबीयांसह १३ जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी बिहारमधील आहेत. तपासात जळालेल्या प्रश्नपत्रिकाही मिळाल्या आहेत. पोलिसांनी एनटीएकडे खातरजमा करण्यासाठी प्रश्नपत्रिका मागविली असून एनटीएकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिस या जळालेल्या प्रश्नपत्रिकांची फॉरेन्सिक चाचणीही करणार आहेत.

३५ विद्यार्थ्यांना पेपर आधीच मिळाला

परीक्षेपूर्वी जवळपास ३५ विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली होती. पाटण्यातील रामकृष्ण नगरात एका भाड्याच्या घरात या सर्व विद्यार्थ्यांना नेण्यात आले व तेथे प्रश्नोत्तरे सांगण्यात आली. पोलिसांनी या घराचीही तपासणी केली. त्यातही काही पुरावे उपलब्ध झालेले आहेत. एनटीएकडून झालेल्या या परीक्षेला ५७१ शहरांतील ४,७५० केंद्रांवर २४ लाख विद्यार्थी बसले होते. निकाल ४ जूनला लागला. तेव्हापासून देशभर गोंधळ आणि विद्यार्थ्यांची निदर्शने सुरूच आहेत.

नऊ परीक्षार्थ्यांना नोटीस

आर्थिक गुन्हे शाखेने नऊ परीक्षार्थ्यांना नोटिसा बजावल्या असून यात बिहारमधील ७, उत्तर प्रदेशातील १, तर महाराष्ट्रातील एकाचा समावेश आहे. या सर्वांनी चौकशीसाठी हजर राहावे, असे आदेश नोटिशीतून देण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news