भांडवली बाजार पाच ट्रिलियनवर! तेजीचे कारण काय? | पुढारी

भांडवली बाजार पाच ट्रिलियनवर! तेजीचे कारण काय?

अनिल पाटील, प्रवर्तक, एस.पी. वेल्थ, कोल्हपूर

देशातील भांडवली बाजारातील सेन्सेक्सने २३ मे रोजी ७५४१८, निफ्टी २२९६७ आणि मिडकॅप ५२४१८ अंकाचा एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. मार्केटमध्ये गेली चार वर्ष हे फक्त भारतातच तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

जग मंदीच्या विळख्यात असताना, आपल्या देशातील मार्केट मात्र नवनवीन उच्चांक प्रस्थापित करीत आहे. आता मार्केटने सर्वोच्च पातळी गाठली असताना, नवीन गुंतवणुकीबाबत काय निर्णय घ्यायला पाहिजे, हा एक गुंतवणूकदारांच्या समोर मोठा प्रश्न आहे. तेजी आणि मंदी हा मार्केटचा स्वभाव असतो. सध्याचा काळ पाहिल्यास तेजीचा दिसतो. सध्या इक्विटीमध्ये अल्पकाळासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर आता गुंतवणूक करणे जोखीम आहे.

मार्केट उच्चांकी पातळीवर असताना गुंतवणूक केल्यास, नजीकच्या काळात मार्केट खाली आले तर गुंतवणुकीचे मूल्य कमी झालेले पाहावयास मिळते. खरे तर भांडवली बाजार हा अल्पकालीन गुंतवणूक नसून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचार केला पाहिजे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक ध्येयधोरणांचा, गुंतवणुकीचा कालावधी आणि घरात येणार्‍या पैशाचा ताळमेळ घालून गुंतवणूक केली पाहिजे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना सध्या मार्केट उच्चांकी पातळीवर आहे, अशा वेळी एकदम गुंतवणूक करण्यापेक्षा थोडी थोडी रक्कम गुंतवणूक योग्य ठरते.

सध्याचा ‘व्हिक्स-व्होलाटाईल इंडेक्स’ स्तर वरच्या पातळीवर आहे. म्हणजेच अस्थिरतेचे प्रमाण खूपच आहे.

अशा वेळी मार्केटची तेजी किंवा मंदीची योग्य दिशा ठरवू शकत नाही. जेव्हा जेव्हा बाजारात अस्थिरता वाढलेली असते, तेव्हा नजीकच्या काळात मार्केट एकदम वर जाऊ शकते अथवा खाली येऊ शकते. बाजाराची पुढची दिशा ठरण्यासाठी निवडणुकीचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समजा, चार जून रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल मोदी सरकार आले तर डिफेन्स आणि सरकारी कंपन्यांमध्ये मोठी तेजी येऊ शकते. सध्यातरी मोदी सरकार येणारच, हे गृहीत धरून मार्केट वाढताना दिसत आहे.

सध्या मार्केट उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. मग हे मार्केट महाग आहे की स्वस्त, हे ओळखायचे कसे? यासाठी तरी मार्केटचा पीई रेषो पाहणे फार गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे मार्केटचा पीई रेषो 10 ते 30 दरम्यान असतो. जितका पीई रेषो जास्त तितके मार्केट महाग असते. ज्यावेळी मार्केट महाग असते, त्यावेळी आपला पोर्टफोलिओ रिबॅलेन्सिंग केला पाहिजे. अशा वेळी आपल्या गुंतवणुकीमधील जोखमीचे प्रमाण कमी करून सुरक्षित गुंतवणुकीकडे भर दिला पाहिजे. तुम्हाला मार्केट स्वस्त आहे की महाग आहे, हे लक्षात येईल. सध्याचा मार्केटचा पीई रेशो हा 24.79 आहे आणि देशाच्या जीडीपीनुसार, मार्केट कॅपिटलचे प्रमाण हे 140% इतके आहे. हे खूपच जास्त आहे. जितके कमी असेल तितका गुंतवणुकीसाठी फायदा होत असतो.

या भांडवली बाजारात सर्वसामान्य लोकांचे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. परंतु मार्केटची दुसरी बाजू अशी आहे की, आपल्या देशामध्ये डिमॅट अकाऊंटची संख्या ही 15 कोटींच्या आसपास गेली असून, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून दर महिन्याला एसआयपीद्वारे वीस हजार कोटीपर्यंतची गुंतवणूक होताना दिसत आहे. आजही अनेक म्युच्युअल फंड मॅनेजर बर्‍यापैकी कॅशवर बसलेले आहेत. अशी परिस्थिती असेल, तर मार्केट खाली येईल हे सांगणे अवघड आहे. जर समजा, मोदी सरकारचा लोकसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षितप्रमाणे नाही लागला, तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड दिसून येईल. पण दीर्घकालीन विचार केला असता, आजही गुंतवणूक करताना थोडी थोडी गुंतवणूक करणे योग्य राहील. कारण मागील पाच वर्षांमध्ये आपल्या देशाची प्रगती फार उल्लेखनीय आहे.

जागतिक बाजारपेठेवर मंदीचे सावट आता हळूहळू कमी होईल, असे वाटत आहे. जर जागतिक पटलावर व्याजदर कमी झाले आणि इतर देशात तेजी चालू झाली की, त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो. कदाचित परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल आणि अजून मोठी तेजी आपणास पाहावयास मिळेल.

अर्थव्यवस्था वाढीचा वेग फक्त आपल्या देशाचा सर्वाधिक आहे. आपल्या देशातील भांडवली बाजाराने 5 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. देशातील भांडवली बाजारातील सहभाग पाहिले असता, स्मॉल कॅप आणि मिडकॅप, मायक्रो कॅप यांचे वाढण्याचे प्रमाण खूपच आहे.

देशाचा भांडवली बाजार आणि जीडीपी हे समांतरपणे थोड्याफार फरकाने वाढत असतात. देशाचा जीडीपी प्रवास पाहिला असता, 1947 पासून 2007 पर्यंत साठ वर्षांमध्ये 1 ट्रिलियन इकॉनॉमी अर्थव्यवस्था झाली आहे. 2014 साली 2 ट्रिलियन, 2021 साली 3 ट्रिलियन अर्थव्यवस्था निर्माण झाली. 2024 मध्ये आता 3.9 ट्रिलियन अर्थव्यवस्था झाली आहे. भांडवली बाजारात मुख्यतः एनएससी आणि बीएससी हे दोन स्टॉक एक्स्चेंज आहेत. एनएससीवर 2266, बीएससीवर 5309 लिस्टेड कंपन्या उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्षी नवनवीन लिस्टेड कंपन्यांची भर पडत आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजार थोड्याफार फरकाने वाढत असतात. आताची परिस्थिती थोडी वेगळी आहे.

जीडीपी 3.9 ट्रिलियन आहे. त्या मानाने मार्केट कॅपिटल हे पाच ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. याचा अर्थ, जीडीपीपेक्षा मार्केट कॅपिटलचा आकार हा मोठा झाला आहे. याचे समीकरण पाहिले असता, सध्याचे मार्केट महाग झालेले दिसते. जीडीपीपेक्षा मार्केट कॅपिटल जितके कमी असेल तितकी गुंतवणुकीस वेळ चांगली असते.

सध्या देश एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. आपल्या देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशाच्या इतिहासात पहिल्यांदा उच्चांकी लाभांश दिला आहे. सन 2013-14 साली 52600 इतका लाभांश दिला होता. यावर्षी 2023-24 सालामध्ये 2,11 लाख कोटी दिला आहे. मागील दहा वर्षांत चारपटीने वाढून लाभांश दिला आहे. आजपर्यंत उच्चांकी लाभांश दिला आहे. यावरून देशाची प्रगती किती वेगाने चालली आहे, हे लक्षात येते. या लाभांशाचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसू शकतात. सरकारला भरीव लाभांश हस्तांतरण केल्याने बाजारातील तरलतेत वाढ होऊ शकते. या वाढलेल्या तरलतेमुळे स्टॉक आणि बाँडस्सह आर्थिक मालमत्तेची मागणीही वाढू शकते. इतका मोठा लाभांश आरबीआय बँकेने दिल्याने देशाचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढलेला दर्शवतो. ही सकारात्मक भावना परकीय गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देऊ शकते, संभाव्यतः शेअर बाजारातील सहभाग वाढू शकतो.

दीर्घकाळाचा विचार केला असता, सध्या जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था ठरत आहे. दीर्घ काळासाठी भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास निश्चितच आपलाच फार मोठा फायदा होणार आहे.

स्मॉल कॅप आणि मिडकॅप, मायक्रो कॅपचा प्रवास पुढीलप्रमाणे दिसतो.

मे 2007 – 1 ट्रिलियन
जुलै 2017 – 2 ट्रिलियन
मे 2021 – 3 ट्रिलियन
नोव्हें. 2023 – 4 ट्रिलियन
मे 2024 – 5 ट्रिलियन

हेही वाचा 

Back to top button