

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा
येथील माहेरवासीन व कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनची आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिसपटू वैष्णवी विनायक सुतार यांचा दिव्यांग दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू म्हणून वैष्णवी यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार व मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
वैष्णवी या कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या टेबलटेनिसपटू आहेत. त्यांनी यापूर्वी आशियाई, राष्ट्रकुल व पॅरा ऑलिम्पिकसह अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. यासह राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करीत देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने त्यांना उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू पुरस्काराने सन्मानित केले.
वैष्णवी यांचे माहेरचे नाव वैशाली आनंदा सुतार असून गडहिंग्लज शहरातील टिळक पथवर त्यांचे कुटुंबीय राहतात. त्यांचे वडील अॅटोमोबाईल पार्ट्सचे व्यापारी तर आई गृहिणी आहेत. त्यांनी आपल्या मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. वैष्णवी यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण गडहिंग्लज पालिकेच्या बॅ. नाथ पै विद्यालयात तर माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज हायस्कूलमध्ये तर कॉमर्सचे शिक्षण घाळी महाविद्यालयात झाले आहे. कोल्हापूर येथील विनायक सुतार यांच्याशी तिचा विवाह झाला असून देवेश व केतन अशी दोन अपत्ये आहेत.
वैष्णवी सुतार ही असाध्य अशा मस्कुलर डिस्टॉफी (ज्यावर अजूनही उपचारपद्धतीचा शोध लागला नाही) या आजाराने ग्रस्त आहे. तिच्या हातातील तसेच पायातील कमकुवतपणामुळे अपंगत्व आले आहे. अशाही परिस्थितीत खचून न जाता तिने अपंगत्व बाजूला सारून बिकट परिस्थितीवर मात केली.
राज्यस्तरासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून त्यांनी सुवर्ण, रजत तसेच कास्यपदकांची कमाई करीत भारताचे नाव सातासमुद्रापार नेले. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए), स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई) व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (टीटीएफआय) मार्फत राष्ट्रकूल स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. १६ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन कांस्यपदक, राष्ट्रीय स्पर्धेत ७ सुवर्ण, २ रजत पदक मिळवले आहे. महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय कांस्यपदक विजेती अपंग टेबल टेनिसपटू बनण्याचा मान मिळविला आहे. पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत त्या २०११ पासून खेळत आहेत.
आतापर्यंत त्यांनी विविध ठिकाणी २६ वेळा स्पर्धेत भाग घेतला आहे. तीन राज्यस्तरीय स्पर्धेत दोन सुवर्ण तर एक रजत पदक मिळवले आहे. तर मैदानी खेळात एक रजत, व दोन कांस्यपदकही मिळवले आहे. त्यांना केएसए अध्यक्ष मालोजीराजे व माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रोत्साहन, तर संग्राम पाटील, पती विनायक सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा