पुणे : पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) एका दौऱ्यानिमित्त पुणे विमानतळावर गेले होते. यावेळी त्यांनी तिथे असलेल्या फोटोंसोबत सेल्फी घेतली. यावर त्यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या ट्वीटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हे यांनी पुणे विमानतळावर असलेल्या पेन्टिंग्जवरून ट्वीट केले आहे.
अमोल कोल्हे (MP Amol Kolhe )आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच; परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट अथाॅरिटीला विसर पडला की काय?, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान कोल्हे यांच्या याल ट्विटमुळे सोशल मीडियामध्ये मात्र धुमाकूळ माजला आहे. काहींच्या मते हे ट्विट योग्य केले आहे असे तर काहीजणांनी विरोध केला आहे.एका युजरने पेशव्यांबद्दल आदर असेल तर पुणे विमानतळाचे नामकरण श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असे करावे, अशी मागणी केली आहे.