Arvind Kejriwal | मोदींनंतर भाजपचा पंतप्रधान कोण? : केजरीवालांचा सवाल | पुढारी

Arvind Kejriwal | मोदींनंतर भाजपचा पंतप्रधान कोण? : केजरीवालांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क: आज आम्हाला विचारले जात आहे की, ‘इंडिया’ आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? पण मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारत आहे की, त्यांचानंतर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (दि.११ मे)  केला. तिहार तुरूंगातून अंतरिम जामिनावर सुटका झाल्‍यानंतर आयाेजित  पत्रकार परिषदेत ते (Arvind Kejriwal) बोलत होते.

जाणून घ्‍या  काय म्‍हणाले केजरीवाल ?

  • देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे. मी माझ्या सर्व शक्तीनिशी लढेन.
  • पंतप्रधान अमित शहांसाठी जनतेकडे मत मागत आहेत.
  • आमच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न कराल तेवढा पक्ष मोठा होईल.
  • ‘वन नेशन वन लिडर’ हे पीएम मोदींचे धोरण आहे.

देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे

पत्रकार परिषदेत बाेलताना केजरीवाल म्‍हणाले की, ५० दिवसानंतर तुम्हा सर्वांमध्ये परत आल्याने मला खूप आनंद होत आहे. कोणालाही वाटत नव्हते की, निवडणुकी दरम्यान मी कारागृहामधून बाहेर येईन; पण  हनुमानाच्या कृपेने मी आज लोकसभा निवडणूक प्रचारासाठी तुमच्यात आहे. त्यामुळे आपल्याला मिळून आपल्या देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे, मी माझ्या सर्व शक्तीनिशी लढेन, मला देशातील 140 कोटी जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे, असे आवाहन देखील केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केले.

मोदी अमित शहांसाठी मते मागतायंत

PM मोदींबाबत बाेलताना  केजरीवाल म्हणाले, आज पंतप्रधान जनतेकडे त्यांच्या नावाने मतं मागत आहेत. ते सप्टेंबरमध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण करत असल्याने पक्षातून निवृत्त होत आहेत. त्यामुळे पीएम मोदी हे स्वत:साठी नाहीत तर गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी जनतेकडे मते मागत असल्याचे केजरीवाल म्हणाले.

पीएम मोदी पक्षातून होणार निवृत्त; मग गॅरंटी कोण करणार पूर्ण ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच पक्षात नियम केला आहे की, पक्षातील उमेदवारांचे वय ७५ झाल्यानंतर त्याने निवृत्ती घ्यायची. या नियमानुसार आत्तापर्यंत लालकृष्ण अडवाणी, सुमित्रा महाजन यांना पीएम मोदींच्या नतृत्त्वाखालील भाजपने आज घरी बसवले आहे. पीएम मोदी जर पुढील वर्षी पक्षातून निवृत्त होत असतील तर आज लोकसभा प्रचारसभेमध्ये ते ज्या गॅरंटी देत आहेत. त्या कोण पूर्ण करणार? असा सवाल देखील केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

‘आप’ पक्ष नाही तर एक विचार

आम आदमी पार्टीला  संपवण्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कोणती कमी केली नाही. आमचा पक्ष नाही तर एक विचार आहे. तुम्ही जेवढे मला आणि आमच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न कराल तेवढा पक्ष मोठी आणि मजबूत होईल, असा विश्‍वासही  केजरीवालांनी व्‍यक्‍त केला.

 मोदींना देशात ‘वन नेशन वन लिडर’ धोरण राबवायचंय

कोणीही पंतप्रधान मोदींना भेटायला जाते तेव्हा ते १० ते १५ मिनिट आम आदमी पक्षावर चर्चा करतात. देशातील केवळ दोन राज्यात आपची सत्ता आहे. इतर पक्षांपेक्षा आमचा पक्ष छोटा आहे; पण इमानदार आहे. याचीच पंतप्रधानांना भीती आहे. पंतप्रधान मोदींना ‘वन नेशन वन लिडर’ हे पीएम मोदींचे धोरण आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकून नष्ट करायचे असल्याचे देखील केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विरोधकांची जेलवारी; केजरीवालांचा दावा

देशात पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विरोधी नेते जेलमध्ये जातील, असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मोदींनी माझ्याविरोधात षडयंत्र रचले. मला जेलमध्ये पाठवले. त्यानंतर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन असे मोदी आणि सत्ताधारी भाजप सरकारला वाटत होते, पण मी हार मानली नाही, मी या दडपशाही सरकारविरोधात लढत राहिलो आणि इथून पुढेही लढत राहीन, असेही ते म्हणाले. तसेच माझ्याविरोधात ज्याप्रकारे षडयंत्र रचले गेले त्याचप्रमाणे इतर अनेक राज्यातील मुखमंत्र्यांविरूद्ध रचण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन त्यांना सरकार पडायचं आहे, असा दावा देखील मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला आहे.

हेही वाचा:

Back to top button