Delhi excise policy case | लोकसभा निवडणुकीआधी BRS ला धक्का, के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला | पुढारी

Delhi excise policy case | लोकसभा निवडणुकीआधी BRS ला धक्का, के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीआधी भारत राष्ट्र समितीला (BRS) मोठा धक्का बसला आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी बीआरएसच्या नेत्या के. कविता यांचा अंतरिम जामीन अर्ज आज सोमवारी (दि.८) राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने फेटाळला. (Delhi excise policy case) के. कविता यांनी त्यांच्या मुलाच्या परीक्षेचे कारण देत अंतरिम जामीन मागितला होता. त्या सध्या मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत आहे. (Delhi excise policy case)

के. कविता यांचा नियमित जामिनासाठी अर्ज न्यायालयासमोर प्रलंबित आहे. त्यावर २० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात १५ मार्च रोजी हैदराबाद येथील बंजारा हिल्स येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती.

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांच्यावर “साउथ ग्रुप”मध्ये प्रमुख सहभाग असल्याचा आरोप आहे. या ग्रुपने दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला मद्य परवान्याच्या मोठ्या वाट्याच्या बदल्यात १०० कोटींची लाच दिल्याचा ईडीचा दावा आहे. गेल्या मंगळवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात के. कविता सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुलाची परीक्षा असल्याच्या कारणावरून त्यांनी दिल्ली न्यायालयात अंतरिम जामीन मागितला होता. या अर्जाला ईडीने विरोध केला होता.

के. कविता यांच्यावर काय आहे आरोप?

के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत. दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान के. कविता यांचे नाव घेतले. त्यानंतर कविता ईडीच्या रडारवर आल्या. ईडीने आरोप केला आहे की ‘साउथ ग्रुप’ नावाच्या लिकर लॉबीनं आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत ‘आप’ नेत्यांना १०० कोटी रुपयांची लाच दिली होती. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आधीच तुरुंगात आहेत. तर या प्रकरणी नुकतीच संजय सिंह यांची सुटका करण्यात आली आहे. (Delhi excise policy case)

हे ही वाचा :

Back to top button