पुढारी ऑनलाईन : भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून ती २०२४ मध्ये ७.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. तसेच जागतिक बँकेने दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थेतील मोठ्या वाढीचे श्रेय भारताला दिले आहे. दक्षिण आशियातील संभाव्यता अल्पावधीत उज्ज्वल बनली आहे. पण अजूनही काही प्रमाणात चिंता असल्याचे नमूद केले आहे. (Indian economy)
"प्रदेशांच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असलेल्या भारतामध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये उत्पादन वाढ ७.५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि अर्थव्यवस्था मध्यम कालावधीत ६.६ टक्क्यांवर येण्याआधी सेवा आणि उद्योगातील उलाढाल मजबूत राहण्याची अपेक्षा आहे." असे जागतिक बँकेने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.
"भारतात आर्थिक वर्ष २०२३-२०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील मजबूत वाढीमुळे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये उत्पादन वाढ ७.५ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विकास दर ६.६ टक्क्यांपर्यंत मध्यम राहण्याची शक्यता आहे. पण त्यानंतरच्या वर्षांमध्ये विकासाचा वेग वाढेल. कारण एक दशकातील मजबूत सार्वजनिक गुंतवणुकीमुळे वाढीचा लाभ मिळतो. २०२३-२०२४ आणि २०२४-२५ मधील वाढीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मागील वर्षातील त्याच्या उंचावलेल्या गतीपासून गुंतवणुकीत झालेली घसरण त्यातून दर्शवते. सेवा आणि उद्योगातील वाढ मजबूत राहण्याची शक्यता आहे. बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मजबूत उलाढालीमुळे अर्थव्यवस्थेला मदत होईल. आर्थिक परिस्थिती सुलभ करण्यासाठी अधिक धोरणात्मकतेला वाव देऊन महागाईचा ताण कमी होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्या मजबूत उत्पादन वाढ आणि एकत्रीकरणाच्या प्रयत्नांमुळे मध्यम कालावधीत, वित्तीय तूट आणि सरकारी कर्ज कमी होण्याचा अंदाज आहे." असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे.
जागतिक बँकेने त्यांच्या अहवालात असे नमूद केले आहे की, एकूणच दक्षिण आशियामध्ये २०२४ मध्ये ६.०-६.१ टक्के वाढ अपेक्षित आहे. ही वाढ पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेली सुधारणा आणि भारतातील मजबूत वाढीमुळे आहे.
२०२३ च्या मध्यापासून भारतातील महागाई दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या २-६ टक्क्यांच्या लक्ष्य श्रेणीमध्ये राहिला आहे, असे अहवालात म्हटले आहे. भारतातील रेपो दर फेब्रुवारी २०२३ पासून जैसे थे राहिला आहे. पण अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत. एल निनो स्थितीमुळे पाऊस कमी होऊन कृषी उत्पादनात काही प्रमाणात घट झाली. परिणामी अन्नधान्याच्या किमती वाढल्या असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.
हे ही वाचा :