Stock Market | २०२४ ची निवडणूक आणि शेअर बाजाराची दिशा, गुंतवणूक कशी करावी? | पुढारी

Stock Market | २०२४ ची निवडणूक आणि शेअर बाजाराची दिशा, गुंतवणूक कशी करावी?

प्रा. डॉ. विजय ककडे

निवडणुका ही केवळ लोकशाही प्रक्रिया न राहता त्यातून एकूण अर्थव्यवहार अनेक पद्धतीने प्रभावित होतात. आपल्या राजकीय भूमिकेसोबत आर्थिक धोरणांचा मसुदा पक्षीय जाहीरनाम्यात अथवा वचननाम्यात असतो. या सर्वांवर देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात.

आपले गुंतवणूक प्रमाण व स्वरूप यात देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणूकदार बदल करतात. परिणामी, निवडणुका व त्याच्या परिणाम गुंतवणूक स्तरावर व शेअर बाजारावर होतो. प्रत्येक छोटा, मध्यम गुंतवणूकदार हा निवडणुकीनंतर बाजार दिशा कशी असेल? गुंतवणूक वाढवावी का काढून घ्यावी, या संभ्रमात असतो. त्यासाठी यापूर्वीच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर व पूर्वी अल्प तसेच मध्यावधी काळात कसा प्रतिसाद दिला होता यावरून बाजार दिशा व आपले गुंतवणूक धोरण स्पष्ट करता येईल. शेअर बाजार हा नेहमीच चढउताराचा असला तरी निवडणुका होणेपूर्वी व नंतरच्या कालखंडात अधिक संवेदनशील दिसतो. विशेषत: निवडणुकापूर्वी 1 महिना आणि 1 वर्ष तसेच निवडणुकीनंतर 1 महिना व 1 वर्ष या कालखंडात दिलेला परतावा आणि दीर्घ काळात 2 वर्षांचा कालावधी याबाबत महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यास मदतकारक ठरेल, हे पुढील कोष्टकातून स्पष्ट होते.

गेल्या सहा सार्वत्रिक निवडणूकापूर्वी व नंतर एक महिन्याच्या कालावधीत म्हणजे अल्पावधीत उणे परतावा दिसतो. निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापन होणे व त्यांचे आर्थिक प्राधान्यक्रम स्पष्ट होणे यासाठी बाजार साशंक अथवा ‘वेट अँड वॉच’ अशा मूडमध्ये असतो. निवडणुकीपूर्वीचा 1 वर्षाचा कालखंड तपासला असता, फक्त एकदाच उणे परतावा असून, 1 वर्षानंतर निवडणूक प्रभावही सकारात्मक दिसतो. जर निवडणुकीनंतर 2 वर्षांचा कालावधी पाहिला तर परतावा केवळ सकारात्मक नव्हे, तर तो दोनअंकी दिसतो. हा परतावा 2 वर्षात सरासरी 41% किवा वार्षिक 20 टक्के इतका चांगला दिसतो. शेअर बाजारातील दीर्घकाल, सावध गुंतवणूक उत्तम परतावा देणे हे स्पष्ट होते. बाजारातील चढउतार व त्यातून गुंतवणूकदारांची भय मानसिकता ही अकारण ठरते. जे घाबरून बाजार सोडतात, त्यांचे मोठे नुकसान होते. जेवढा कालावधी अधिक तेवढा परतावा स्थिर व अधिक, हे सूत्र दिसते. गुंतवणूक महागुरू वॉरेन बफे यांच्या मार्गदर्शक सूत्रानुसार शेअर्स घेतल्यानंतर पुढील 5 वर्षे बाजार बंद आहे, असे समजून गुंतवणूक करावी.

2024 ची निवडणूक व बाजार दिशा

शेअर बाजाराने काही महिने उच्चांक स्थापन केले असून, भविष्यकाळात बाजार बळकट असणार हे स्पष्ट आहे. निवडणुका व शासनाचे धोरण याबाबत सत्तांतर झालेली धोरण चौकट बदलली नाही, हे महत्त्वाचे आहे. अल्पकाळात असणार्‍या अनिश्चितेतून व जर घसरण झालीच तर चांगले शेअर्स खरेदीची ती संधीत ठरते. दीर्घ पल्ल्याचा विचार करता पायाभूत गुंतवणूक, तंत्रविकास, विस्तारणारा मध्यमवर्ग व त्याची वाढती कार्यशक्ती, आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा ओघ यामध्ये सर्व सकारात्मक कल असल्याने निवडणुकीनंतरचे 1 ते 2 वर्ष हे 15 ते 20% परतावा देऊ शकतील, असा अंदाज व्यक्त केला जातो.

सध्याची राजकीय पक्षनिहाय स्थिती आगामी काळात स्थिर सरकार देऊ शकेल, या स्वरूपाची असल्याने किमान 2 ते 5 वर्षांचा गुंतवणूक कालखंड समोर ठेवून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे ही धोरणरचना चांगला परतावा देऊ शकते. बाजार जागतिक स्तरावर अधिक संधी देणारा ठरत असून, भारत गुंतवणुकीचे आकर्षक क्षेत्र ठरत असल्याने वित्तीय गुंतवणूक करण्यास शेअर्स व म्युच्युअल फंड हे वित्तीय संपत्ती निर्मितीचे, आर्थिक स्थैर्याचे साधन ठरू शकतात. अत्यल्पकालीन मोठा नफा हा जसा एक फसवणुकीचा मार्ग ठरतो तसेच अल्पकालीन तोटा पाहून, बाजारात होणारी घसरण पाहून बाजार न सोडणे हे ही महत्त्वाचे आहे.

Back to top button