T+0 Settlement | ‘टी प्लस झिरो’ म्हणजे काय?; गुंतवणूकदारांना कसा फायदा होईल? | पुढारी

T+0 Settlement | ‘टी प्लस झिरो’ म्हणजे काय?; गुंतवणूकदारांना कसा फायदा होईल?

वनिता कापसे

शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करणार्‍यांची संख्याही वाढत आहे. यामध्ये इंडेक्स ट्रेडिंग, कमोडिटी ट्रेडिंग, शेअर्स ट्रेडिंग, कमोडिटी ट्रेडिंग यांमध्ये ट्रेडिंग करणार्‍यांचे प्रमाण कोव्हिडनंतरच्या काळात वाढले आहे. या ट्रेडर्स वर्गासाठी बाजारनियामक संस्था सेबीने अलीकडेच एक खुशखबर दिली आहे. त्यानुसार 28 मार्चपासून मर्यादित समभागांसाठी भारतीय शेअर बाजारामध्ये टी+0 ही सेटलमेंट प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या ही प्रायोगिक तत्त्वावर असली तरी हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. (T+0 Settlement)

गतवर्षी सेबीने टी+1 ही प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे शेअर्स विकल्यानंतर संबंधित रक्कम डिमॅट खात्यात येण्यासाठी गुंतवणूकदारांना जी दोन दिवस वाट पाहावी लागत होती, तो कालावधी कमी होऊन एक दिवसावर आला. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने आज एखादा शेअर विकला तर दुसर्‍याच दिवशी त्याचे पैसे त्याच्या डिमॅट खात्यात जमा होत होते. टी+1 सेटलमेंट लागू करणारा भारत हा जगातील चीननंतर दुसरा देश ठरला.

युरोप, अमेरिका आणि जपानमध्ये अद्यापही टी+2 सेटलमेंट लागू केली जात आहे. आता टी-0 सेटलमेंटअंतर्गत ही प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे, त्यामुळे समभागांची विक्री केल्यानंतर पैसे मिळण्यासाठी एक दिवसही वाट पाहावी लागणार नाही. ज्या दिवशी समभागांची विक्री होईल, त्याच दिवशी लगेचच त्याच्या खात्यात हे पैसे जमा होतील. जर गुंतवणूकदारांनी ट्रेडिंगच्या दिवशी दुपारी 1.30 वाजेपर्यंत शेअर्स खरेदी केले किंवा विकले, तर त्यांचे सेटलमेंट 4.30 वाजेपर्यंत केले जाईल. म्हणजे त्या वेळेत पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. ही सेटलमेंटची व्यवस्था ऐच्छिक तत्त्वावर उपलब्ध होणार आहे. हा आता एक पर्याय म्हणून सादर केला जात असल्याने, टी-1 सेटलमेंट सध्या सुरूच राहणार आहे. (T+0 Settlement)

टी+0 सेटलमेंटमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढेल, असे सेबीचे म्हणणे आहे. याचे कारण सद्य:स्थितीत लहान गुंतवणूकदार सहसा बाजारापासून दूर राहतात कारण त्यांचे पैसे त्यांच्यापर्यंत त्याच दिवशी पोहोचत नाहीत. आता ब्रोकर्सजवळ गुंतवणूकदारांचा पैसा एक दिवसही अडकून राहणार नाही, यामुळे साहजिकच धोका कमी होईल. त्यातून किरकोळ गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल. टी+0 प्रणालीची पूर्ण अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर डिमॅटची संख्या आणखी झपाट्याने वाढेल, असे सेबीचे म्हणणे आहे.

Back to top button