Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर, तामिळनाडूतील ९ उमेदवारांची घोषणा | पुढारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर, तामिळनाडूतील ९ उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तिसरी यादी गुरुवारी (दि.२१) जाहीर केली. या तिसऱ्या यादीमध्ये एकूण नऊ उमेदवार असून सर्व तमिळनाडू राज्यातील आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई, माजी राज्यपाल तमिलीसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीसाठी घाई केली आहे. भाजपने मात्र यामध्ये आगेकूच करत याआधी २ मार्चला पहिल्या यादीत १९५ आणि १३ मार्चला दुसऱ्या यादीत ७२ उमेदवारांची घोषणा केली. त्या पाठोपाठ गुरुवारी (२१ मार्च) भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण नऊ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून हे सर्व उमेदवार तामिळनाडू राज्यातील आहेत. (Lok Sabha Election 2024)

या नऊ उमेदवारांमध्ये यांचा समावेश

भाजपने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत चेन्नई दक्षिणमधून तमिलीसाई सुंदरराजन, मध्य चेन्नईमधून विनोज पी. सेल्वम, वेल्लोरमधून डॉ. ए. सी. शणमुगम, कृष्णागिरीमधून सी. नरसिम्हा, निलगिरीमधून एल. मुरुगन, कोइंबतूरमधून के. अन्नमलाई, पेरंबलुरुमधून टी. आर. पारिवेंधर, तिरूनेलवेळीमधून नयणार नागेंद्रन आणि कन्याकुमारीमधून पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्राची दुसरी यादी कधी?

भाजपने आतापर्यंत दोन उमेदवारी याद्या घोषित केल्या. यामध्ये दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह २० उमेदवारांची घोषणा केली. मात्र महाराष्ट्रातील अन्य उमेदवारांची प्रतीक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील नागपूर, चंद्रपूर मतदारसंघासाठी उमेदवारी घोषित केली असली तरी गडचिरोली, रामटेक, भंडारा-गोंदियासाठी अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आली नाही. सातारा, माढा अशा काही जागांहून कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. भाजप ४८ पैकी नक्की किती मतदारसंघ लढणार हे चित्र अद्याप स्पष्ट नाही. सोबतच भाजपच्या काही विद्यमान खासदारांच्या मतदारसंघातील उमेदवारी आणखीन जाहीर न झाल्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीची प्रतीक्षा आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही वाचा :

Back to top button