

पुढारी ऑनलाईन डेस्क
देशातील हजारो बेरोजगार युवकांना वर्क फ्रॉम होम नोकरी देण्यावरुन कोट्यवधींची फसणूक केल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने या संबंधी एका मलगीसह चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये रोहित कुमार (२३), मोहित सिंह (२५), तरुण कुमार (२५), आणि एका मुलगीचा यात समावेश आहे. या चौघांनी अगोदर एक वेबसाईट बनवून तरुणांना यात अडकवले.
वर्क फ्रॉम होम नोकरी देण्याअगोदर तरुणांकडून त्यांनी एक करार करुन घेतला होता. यानंतर तरुणांना कामाचे असे टारगेट दिलं जायचं जे कधी पूर्ण व्हायचे नाही. काम न झाल्यास करार दाखवून त्या तरुणांना भीती घातली जायची आणि त्यांच्याकडून वसुली केली जायची. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त तरुणांनी तक्रार दाखल केली आहे. या चौघांनी हजारो लोकांना फसवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सायबर सेलचे पोलीस उपायुक्त केपीएस गिल यांनी सांगितले की, नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) नंबरवर फसवणूक झालेल्या तरुणांनी आपली तक्रार नोंदवली आहे. सुरुवातीला देशभरातून पोलिसांना सुमारे ६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली सर्वांची फसवणूक झाल्याचा आरोप सर्व तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
तपासादरम्यान आरोपींनी बनावट वेबसाइट तयार केल्याचे पोलिसांना समजले. या वेबसाइट्सच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या काम करून मोठी कमाई करू शकता, असा दावा वेबसाइटवर करण्यात आला होता. तरुण त्यांच्या जाळ्यात येताच आरोपी त्यांना धमकावून पैसे उकळायचे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लगेचच पोलिस अधिकारी सज्जन सिंग, एसआय धर्मेंद्र कुमार आणि इतरांची टीम तयार करण्यात आली.
या चार आरोपींना दिल्लीतील मोहन गार्डन आणि मायापुरी परिसरातून ताब्यात घेतलं आहे. सुरुवातीला तपासादरम्यान या चौघांनी देशातील ५०० जणांची फसवणूक केल्याची समोर आले. पण या चौघांनी अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले. पोलिस त्यांच्या बँक खात्याची चौकशी करत आहेत.
तपासादरम्यान रोहित कुमार हा टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बनावट वेबसाइट तयार करून त्याने फसवणूक सुरू केली. त्यांनी बँक खात्यांची व्यवस्था केली. याशिवाय तो स्वत: टीम लीडर म्हणून बनावट कॉल सेंटर चालवत होता. अटक करण्यात आलेले उर्वरित तीन आरोपी हे टेलिकॉलर आहेत. या प्रकरणात आणखी काही लोक सामील असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
कोविड काळात लॉकडाऊन दरम्यान, देशभरातील अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. अशा स्थितीत लोक घरच्या कामातून काम पाहू लागले. याचा फायदा घेत आरोपींनी बनावट वेबसाइट तयार केली. जॉब प्लेसमेंट साइट्सवरून डेटा विकत घेऊन आरोपी त्या तरुणांशी संपर्क साधायचे. याशिवाय अनेकवेळा तरुण स्वतःहून त्यांच्या वेबसाइटवर येत असत.
सुरुवातीला पीडितांना त्यांचे आधार, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रांची मागणी करण्यात येत होती. यानंतर ऑनलाईन चोरीचा करारनामा करण्यात आला. टारगेटनुसार सर्व कामे करावी लागतात, असे आरोपी सांगत होते. टारगेट पूर्ण न झाल्यास किरकोळ दंड भरावा लागेल. पुढे कामाच्या नावाखाली त्रस्त तरुणांना असे टारगेट दिले जे कधीच पूर्ण झाले नाही. यानंतर कोर्टाचा धाक दाखवून कराराच्या नावाखाली तरुणांकडून १५ ते २० हजार रुपये उकळले.