पुढारी ऑनलाईन डेस्क : Sidhu Moosewala murder case : सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात अटक करण्यात आलेला गँगस्टर दीपक टिनू रविवारी पहाटे मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. दीपक टिनू हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार आहे. सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात आरोपी दीपकची चौकशी करायची होती. मात्र, त्याआधीच तो फरार झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पंजाब पोलिसांनी राजस्थान आणि हरियाणाशी जोडलेली सीमा सील केल्या असून शोध मोहीम सुरू आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा गुंड दीपक टिनू हा मानसाच्या सीआयए पथकाच्या ताब्यातून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानसा सीआयए पथक त्याला कपूरथला जेलमधून चौकशीसाठी आणत होते. यावेळी पोलिसांच्या पथकाला चकमा देऊन तो पळून गेल्याचे समजते आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मानसा पोलिसांनी दीपक टिनूच्या फरार झाल्याची पुष्टी केली आहे. मानसा पोलिसांनी सांगितले की, आज (दि. 2) सकाळी दीपक टिनूला सीआयएच्या पथकाद्वारे कपूरथळा कारागृहातून एका खासगी वाहनातून चौकशीसाठी मानसा येथे आणले जात होते. सिद्धू मूसवाला खून प्रकरणाशी संबधीत त्याच्याकडे चौकशी करण्यात येणार होती. मात्र, दीपक टिनू फरार झाला.
गँगस्टर दीपक कुमार उर्फ टिनू हा हरियाणातील भिवानी येथील रहिवासी आहे. टिनूचे वडील चित्रकार आहेत. दीपक कुमार उर्फ टिनू याच्यावर हरियाणा, पंजाब, चंदीगड, राजस्थान, दिल्ली येथे खून, खुनाचा प्रयत्न असे 35 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो 2017 पासून तुरुंगात आहे. तो गेल्या 11 वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. त्याने भिवानीमध्ये बंटी मास्टरची हत्या केली, तर पंजाबमध्ये त्याने गुंड लवी देवडाला गोळ्या घालून ठार केले. दीपकपाठोपाठ त्याचा लहान भाऊ चिरागही ड्रग्ज तस्करी आणि कार स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अडकला आहे.