

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील बदायूं येथे दोन लहान मुलांच्या खुनाच्या घटनेत नवा तपशील पुढे आला आहे. खुनातील संशयित पाच हजार रुपये उधार मागण्याचे निमित्त करून या मुलांच्या घरी आला होता, आणि संधी साधून मुलांचा खून केला.
संशयित आरोपी साजीद याचे केशकर्तनालयाचे दुकान आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी हे दुकान पेटवून दिले. तर पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये साजीद ठार झाला आहे. तर या गुन्ह्यातील आणखी एक संशयित साजीदचा भाऊ जावेद बेपत्ता आहे. (Badaun Double Murder)
साजीदच्या दुकानाशेजारीच विनोद ठाकूर यांचे घर आहे. विनोद आणि साजीद यांची चांगली ओळखही आहे. मंगळवारी रात्री साजीद हा विनोद यांच्या घरी आला. त्या वेळी विनोद घरी नव्हते, त्यांची पत्नी संगीता याने साजीदकडे विचारणा केली. साजीद याने बायको गरोदर असून तिच्यावर उपचार करण्यासाठी ५ हजार रुपयांची मदत मागितली. संगीताने ही कल्पना विनोद यांना फोनवरून दिली. विनोद यांनी साजीदला ५ हजार रुपये द्यावेत असे सांगितले. यानंतर संगीता चहा बनवण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या असता साजीदने त्यांची दोन मुले आयुष (११) आणि अहान (६) यांची गळा चिरून हत्या केली. तर ७ वर्षांचा मुलगा पियूष पळून जाण्यात यशस्वी झाला. असे NDTVच्या बातमीत म्हटले आहे. (Badaun Double Murder)
साजीद याच्यासोबत त्याचा भाऊ जावेद ही होता. जावेद हा ठाकूर यांच्या घराबाहेर दुचाकी घेऊन थांबला होता. साजीदने हत्या केल्यानंतर तो जावेदसोबत पळून गेला. साजीद एका शेतात लपून बसला होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला, तर पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात साजीद ठार झाला. जावेद मात्र अजूनही बेपत्ता आहे.
या प्रकार जादूटोण्यातून घडला नसेल असे पोलिसांनी म्हटले आहे. तर विनोद ठाकूर यांनी साजीदसोबत कोणताच वाद झाला नसल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा