

पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील बदायूं येथील एका नाभिकाने शेजारी राहणाऱ्या दोन मुलांचा कथितपणे खून केला आणि दुसऱ्याला गंभीर जखमी केले, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. नंतर पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये सदर नाभिकाचा मृत्यू झाला. ही घटना मंडी समिती पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बाबा कॉलनीत घडली. सदर आरोपीने शेजाऱ्याच्या घरात घुसून एका ११ आणि ६ वर्षांच्या दोन भावांचा वस्तऱ्याने गळा चिरला, तर तिसऱ्या मुलाला जखमी केले. (UP Badaun Double Murder)
साजिद (वय २२) असे त्या आरोपीचे नाव असून त्याने दोन्ही मुलांची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता आणि या दरम्यान झालेल्या एन्काउंटरमध्ये साजिद मारला गेला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचे त्याच्या शेजारी असलेल्या विनोद कुमार यांच्या कुटुंबाशी अनेकदा वाद झाला होता. जेव्हा साजिद घरात घुसला तेव्हा सलून चालवणाऱ्या विनोद कुमारची पत्नी तिच्या तीन मुलांसह घरात एकटीच होती.
त्यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साजिद हा विनोद यांच्या घरी आला आणि त्याने त्यांची मुले आयुष, पियुष आणि हनी यांच्यावर हल्ला केला. मुलांची आई खाली सलूनमध्ये होती. मुलांचा आरडाओरडा ऐकून लोकांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली. पण आरोपी तोपर्यंत पळून गेला होता.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण संतप्त झालेल्या स्थानिक लोकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला. मृतदेह घेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिका नातेवाईकांनी परत पाठवल्या. त्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि त्यानंतर मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
बदायूंचे जिल्हा दंडाधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले की, पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पण त्यानंतर तेथील रहिवाशी संतप्त झाले. दरम्यान, बरेलीचे पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार म्हणाले की, आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पण प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
"पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पोलिसांवर गोळीबारही केला. यामुळे प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपीचा जागीच मृत्यू झाला. सदर आरोपीचे वय २५ ते ३० दरम्यान आहे." असे राकेश कुमार यांनी सांगितले.
बदायूं दुहेरी हत्याकांड प्रकरणी एसएसपी आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले, "आरोपी साजिद काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरात घुसला आणि तो लहान मुले खेळत असलेल्या टेरेसवर गेला. त्याने दोन्ही मुलांवर हल्ला करून त्यांची हत्या केली. त्यानंतर तो खाली आला, तिथे जमावाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो निसटला. आरोपी पळून गेल्याचे लक्षात येताच पोलिसांच्या पथकांनी कारवाई सुरु केली. आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला आणि त्याला प्रत्युत्तरादाखल मारण्यात आले. त्याच्याकडील हत्यार आणि रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे.. आरोपीचा भाऊ जावेद याचेही नाव एफआयआरमध्ये आहे. त्याचा शोध घेतला जात असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आरोपीने मृत मुलांच्या वडिलांकडे ५ हजार रुपयांची मागणी केली होती. .." (UP Badaun Double Murder)
ज्या दोन मुलांची हत्या करण्यात आली त्यांच्या १० वर्षांच्या भावाने सांगितले की हल्लेखोर त्यालाही मारणार होता. पण तो त्याला मारु शकला नाही. आज तक या वृत्त वाहिनीशी बोलताना दोन्ही मुलांच्या अल्पवयीन भावाने म्हटले, आरोपीने (२२ वर्षीय साजिद) आवाज न करता आपल्या दोन्ही भावांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. काही वेळाने तो त्या दोघांना टेरेसवर घेऊन गेला. "त्याने मलाही पकडले आणि माझे तोंड दाबून धरले. त्यामुळे मी आरडाओरड करु शकलो नाही," असे मुलाने सांगितले. "हल्लेखोराचा पाय फुटलेल्या काचेच्या आरशात अडकल्याने तो स्वत:च जखमी झाला. तर मी पळून गेलो आणि खाली सर्वांना याची माहिती दिली," तो पुढे म्हणाला, "माझा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात माझ्या बोटाला दुखापत झाली."
हे ही वाचा :