Dhanve murder case : वर्चस्ववादाच्या लढाईतून खून; चौघांना ठोकल्या बेड्या | पुढारी

Dhanve murder case : वर्चस्ववादाच्या लढाईतून खून; चौघांना ठोकल्या बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पिंपरीतील गुंड अविनाश धनवे याच्या खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. हे चारही गुन्हेगार प्रतिस्पर्धी टोळीतील आहेत. कारागृहातील मारहाण आणि परिसरातील वर्चस्ववादाच्या लढाईतून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. शिवाजी बाबूराव भेंडेकर (वय 35), मयूर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय 20), सतीश ऊर्फ सला उपेंद्र पांडे (वय 20, सर्व रा. आळंदी देवाची), सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय 22, रा. सोळू, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, कोयते आणि चारचाकी गाडी जप्त केली आहे. तर, त्यांच्या इतर फरार साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.

इंदापूर शहरास लागून असलेल्या महामार्गावरील हॉटेल जगदंब येथे शनिवारी रात्री पिंपरीतील गुन्हेगार अविनाश बाळू धनवे (वय 31, रा. च-होली बुरा, वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याचा चार गोळ्या झाडून आणि कोयत्याने तब्बल वीसपेक्षा अधिक वार करून खून करण्यात आला होता. धनवे हा बंटी ऊर्फ प्रणिल मोहन काकडे, राजू एकनाथ धनवडे, राहुल एकनाथ धनवडे यांच्यासोबत जेवण करण्यासाठी थांबलेला होता. जेवणाची ऑर्डर देऊन चौघेही टेबलवर बसलेले असताना आठ जणांचे टोळके हातात पिस्तूल व कोयता घेऊन आले. त्यांनी हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाश धनवे याच्यावर पिस्तूलमधून गोळीबार केला व कोयत्याने त्याच्यावर वार करून त्याचा जागीच खून केला. त्या वेळी धनवेसोबतचे तीन मित्र हे त्या ठिकाणाहून पळून गेले. याप्रकरणी धनवे याची पत्नी पूजा धनवे हिने इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता, हा गुन्हा दोन गुन्हेगारी टोळीतील पूर्ववैमन्यसातून झाला असल्याचे निष्पन्न झाले. मयत अविनाश बाळू धनवे याची चर्‍होली परिसरात दहशत होती. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगारी टोळीसोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याच्या विरोधी टोळीनेच केला असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्या दृष्टीने तपास करता, गुन्ह्यातील आरोपी हे कोल्हापूरकडे पळून जात असल्याची खबर मिळाली होती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपींना पुणे-कोल्हापूर महामार्गावरील शिंदेवाडी गावच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले.या आरोपींना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील इतर पाहिजे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे , सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजित एकसिंगे, स्वप्निल अहिवळे, राजू मोमीन, अतुल डेरे, सचिन घाडगे, नीलेश सुपेकर यांच्या पथकाने केली.

कारागृहातील मारहाण जिव्हारी…

गुंड अविनाश धनवे याने येरवडा कारागृहात असताना, शिवाजी भेंडेकर आणि मयूर पाटोळे याला मारहाण केली होती. ही मारहाण दोघांच्या जिव्हारी लागली होती. भेंडेकर हादेखील सराईत गुन्हेगार आहे. आळंदी येथील गजानन नवगिरे आणि गंगाधर गडदे या दोघांच्या खुनाच्या गुन्ह्यात तो 2012 ते 2022 या कालावधीत येरवडा कारागृहात बंदी होता. तेव्हादेखील त्यांच्यात धुसफूस सुरू होती. त्यातूनच या दोघांनी अविनाश याचा गेम सेट केल्याचे पोलिसांनी सांगितले.

खुनाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत चौघा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या इतर फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. दोन टोळ्यांतील वर्चस्ववादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अविनाश धनवे हादेखील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. चाळीस दिवसांपूर्वी तो मोक्कातील गुन्ह्यात येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर
आला होता.

पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण

चाळीस दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर

धनवे याच्यावर पोलिसांच्या रेकॉर्डवर आठ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाईदेखील झाली होती. तो 7 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजेच चाळीस दिवसांपूर्वी जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार धनवे याचा चार वर्षांपूर्वी खुशाल तापकीर याच्यासोबत वाद झाला होता, त्या वेळी खुशाल आणि त्याच्या साथीदारांनी अविनाश धनवे याच्यावर गोळीबार केला होता. याबाबत दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुशाल तापकीर हा अविनाश याला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत होता. पूर्ववैमनस्याच्या कारणातून खुशाल तापकीर आणि विशाल तापकील या दोघांच्या सांगण्यावरून अविनाश धनवे याचा खून करण्यात आला असल्याचा संशय धनवे याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button