मुंबईच्या अधिकाऱ्यांची जाँबाज कामगिरी, २ परेदशी महिलांकडून १०० कोटींचे कोकेन जप्त; आंतराष्ट्रीय रॅकेट | पुढारी

मुंबईच्या अधिकाऱ्यांची जाँबाज कामगिरी, २ परेदशी महिलांकडून १०० कोटींचे कोकेन जप्त; आंतराष्ट्रीय रॅकेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई विमानतळावर 2 परेदशी महिला संशयित तस्करांना अटक करून त्यांच्याकडून ९.८९२ किलो इतके कोकेन जप्त करण्यात आले आहे. या कोकनेची बाजारातील किंमत तब्बल १०० कोटी इतकी आहे. या कारवाईनंतर दिल्लीतून एका संशयित नायजेरियन ड्रग डिलरलाही अटक करण्यात आली आहे.

हे ड्रग्ज दिल्ली आणि देशातील इतर भागात पोहोचवण्याची जबाबदारी या महिलांवर होती. या कारवाईमुळे एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे. ही कारवाई डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या (डी. आर. आय.) टीमने केली. अटक करण्यात आलेल्या महिला इंडोनेशिया आणि थायलंड देशाच्या नागरिक आहेत. त्या अद्दिस अबाबा आणि इथिओपियातून भारतात प्रवास करत होत्या.

या दोन महिलांना पडकल्यानंतर डी. आर. आय.च्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. या महिलांनी दिलेली माहिती आणि डी. आर. आय.चे इंटेलिजन्स याच्या सहायाने दिल्लीत हे ड्रग्ज पाठवले जाणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डी. आर. आय.च्या अधिकाऱ्यांची एक टीम तातडीने दिल्ली जवळील ग्रेटर नोएडा येथे रवाना झाली. येथे सापळा रचून एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात झाली. या ड्रग डिलरने डी. आर. आय.च्या अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की केली, यात अधिकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

या दोन महिला आणि नायजेरियन व्यक्ती या तिघांवर एन. डी. पी. एस. कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे. तस्करांचे हे रॅकेट इथिओपिया, श्रीलंका, नायजेरिया आणि भारतात कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे.

Back to top button