Lok Sabha Election date 2024 | ब्रेकिंग! लोकशाही उत्सवाला प्रारंभ! लोकसभेसाठी ७ टप्प्यांत मतदान, जाणून घ्या मतदान आणि निकालाची तारीख

Lok Sabha Election date 2024 | ब्रेकिंग! लोकशाही उत्सवाला प्रारंभ! लोकसभेसाठी ७ टप्प्यांत मतदान, जाणून घ्या मतदान आणि निकालाची तारीख
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज शनिवारी (दि.१६) लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखांची घोषणा केली. (Lok Sabha Election date 2024) लोकसभा निवडणूक २०२४ साठी ७ टप्प्यांत मतदान होईल आणि ४ जून रोजी मतमोजणी होईल. लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी, पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी, सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्यांतील मतदान १ जून रोजी होईल आणि मतमोजणी ४ जून होईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मतदारसंघनिहाय मतदान तारखा पुढीलप्रमाणे

महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे असे पाच टप्प्यांत मतदान होईल.

◾️पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾️दुसरा टप्पा २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾️तिसरा टप्पा ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾️चौथा टप्पा १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾️पाचवा टप्पा २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

१२ राज्यांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक

२०२४ हे जगभरात निवडणुकीचे वर्ष आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताकडेही जगाचे लक्ष आहे. १६ जूनला सध्याच्या लोकसभेची मुदत संपत आहे. आता देशातील निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. देशात ९६.८ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. १०.५ लाख मतदान केंद्र आहेत. दीड कोटी मतदार अधिकारी निवडणुकीचे काम पाहतील. तर ५५ लाख ईव्हीएम, ४ लाख वाहने असतील. १ कोटी ५२ लाख नवीन मतदार आहे. १०० वर्षावरील २ लाख मतदार आहेत. १ हजार पुरुष मतदारांमागे ९४८ महिला मतदार आहेत. नवीन महिला मतदारांची संख्या ८५ लाख आहे. १२ राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

आमच्याकडे १.८ कोटी पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आहेत. १९.४७ कोटी मतदार २०ते २९ वयोगटातील आहेत. दिव्यांगाना घरातून मतदान करता येणार असल्याचे ते म्हणाले. निवडणूक यंत्रणा प्रत्येक मतदार केंद्रावर पोहोचणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

निवडणुकीत कुठेही हिंसेला स्थान नाही

निवडणुकीत कुठेही हिंसेला स्थान नसेल. त्यासाठी राजकीय पक्षांनी याची खबरदारी घ्यावी. जिथून आम्हाला हिंसाचाराची माहिती मिळेल, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. निवडणुकीत पैशाचा गैरवापरही होऊ देणार नाही. असा इशारा राजीव कुमार यांनी दिला आहे. "राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, मिझोराम, मेघालय, नागालँड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि त्रिपुरा या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये सुमारे ३,४०० कोटी रुपयांच्या रोकड जप्त करण्यात आली होती. ही वाढ ८३५ टक्के एवढी दर्शवते…" तसेच राजकीय पक्षांनी जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा. अफवा रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांपर्यंत ॲडव्हायजरी पोहोचवली जाईल, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीरसिंह संधू आणि ज्ञानेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी बैठक घेतली होती. त्यानंतर लोकसभेच्या २०२४ सार्वत्रिक निवडणुका आणि राज्य विधानसभांच्या निवडणुकांचे वेळापत्रक आज दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

मतदान 'ईव्हीएम'वरच होणार

आगामी लोकसभा निवडणुकीत 'ईव्हीएम 'ऐवजी मतपत्रिकांवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकेत काहीही तथ्य दिसत नाही, असे मत ही याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने व्यक्त केले, हे विशेष! न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. अॅड. एम. एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती. राज्यघटनेच्या कलम १०० चा संदर्भ देऊन मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया ही एक आवश्यक तरतूद असल्याचे शर्मा यांनी याचिकेत नमूद केले होते. (Lok Sabha Election date 2024)

२०१९ ची निवडणूक झाली होती ७ टप्प्यांत

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम ११ एप्रिल ते १९ मेदरम्यान ७ टप्प्यांत पार पडला होता. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे २३ मे २०१९ रोजी निकाल लागला होता; तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम ५ मार्च रोजी जाहीर झाला होता. त्यावेळी ७ एप्रिल ते १२ मेदरम्यान ९ टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळीही मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर चौथ्या दिवशी १६ मे रोजी निकाल लागला होता.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपला ३०३ तर काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या होत्या. त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्याइतपत संख्याबळ मिळू शकले नव्हते. ही निवडणूक १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली आणि ती ७ टप्प्यांत पार पडली होती.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news