मोठी बातमी : मध्‍य प्रदेश मंत्रालयातील वल्लभ भवन इमारतीला भीषण आग, ५ कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका | पुढारी

मोठी बातमी : मध्‍य प्रदेश मंत्रालयातील वल्लभ भवन इमारतीला भीषण आग, ५ कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या इमारतीला (वल्लभ भवन) आज ( दि. ९ मार्च ) सकाळी आग लागली. वल्लभ भवनच्या काही मजल्यांवर आग लागली, ही वेगाने पसरत आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (MP Fire News) दरम्‍यान, मंत्रालयाच्या जुन्या इमारतीत अडकलेल्या पाच कर्मचाऱ्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. मात्र आणखी काही कर्मचारी इमारतीत अडकले आहेत की नाही हे समोर आलेले नाही.

भोपाळमधील जुन्या मंत्रालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी सकाळी आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि लवकरच चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता मंत्रालयाच्या गेट क्रमांक पाच ते सहा दरम्यान स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मंत्रालयाच्या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या, मात्र जोरदार वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली. (MP Fire News)

MP Fire News: सफाई कामगारांनी दिली आगीची माहिती

मंत्रालयातील वल्लभ भवन इमारतीच्या ५ आणि ६ क्रमांकाच्या गेटसमोर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इमारतीत धूर निघताना दिसला. त्यानंतर मंत्रालयाचे सुरक्षा अधिकारी आणि अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने एकही कर्मचारी मंत्रालयात उपस्थित नव्हता. तत्पूर्वी वल्लभ भवनाजवळील सातपुडा भवनच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. त्यात आरोग्य विभागाच्या अनेक महत्त्वाच्या फायली व कागदपत्रे जळाली असल्याचे वृत्त देखील स्थानिक माध्यमांनी दिले आहे. (MP Fire News)

जोरदार वाऱ्यामुळे आग पसरली

अग्निशमन दलाच्या चार गाड्यांद्वारे आग विझवण्याचे काम सुरू झाले, मात्र जोरदार वारा आणि आग वरच्या मजल्यावर असल्याने भोपाळ शहरातील कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणता आली नाही. यानंतर भेल, ईएमई सेंटर बैरागढ आणि भोपाळ विमानतळावरून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत भोपाळ महापालिकेचे अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे आगीने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्याला कवेत घेतले आहे.

५ कर्मचाऱ्यांची सुरुरुप सुटका

मंत्रालयाच्या जुन्या इमारतीत अडकलेल्या पाच कर्मचाऱ्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. मात्र आणखी काही कर्मचारी इमारतीत अडकले आहेत की नाही हे समोर आलेले नाही. हे कर्मचारी आधीच मंत्रालयात हजर होते की आग विझवण्यासाठी आणि कागदपत्रे सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मंत्रालयात पोहोचले होते, हे पोलिस आणि महापालिकेचे कर्मचार्‍यांनी अद्‍याप स्‍पष्‍ट केलेेले नाही.

मंत्रालय होते ३८ तास बंद

शुक्रवारी महाशिवरात्री आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मंत्रालयाला सुट्टी असतानाही शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मंत्रालयाला आग लागल्याचे निदर्शनास आले. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मंत्रालय बंद झाल्यानंतर तेथे कोणीही नव्हते. शुक्रवारी दिवसभर बंद होते, शनिवारी आग लागली, त्यामुळे ३८ तास कार्यालय बंद राहिल्यानंतर आग कशामुळे लागली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा:

Back to top button