Loksabha Election 2024 : वाराणसीत PM मोदींविरोधात ‘इंडिया’ आघाडीमध्‍ये ‘या’ नावाची चर्चा | पुढारी

Loksabha Election 2024 : वाराणसीत PM मोदींविरोधात 'इंडिया' आघाडीमध्‍ये 'या' नावाची चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी शनिवार, २ मार्च रोजी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून सलग तिसर्‍यांदा निवडणूक लढविणार आहेत. आता इंडिया आघाडीकडून नरेंद्र मोदी यांच्‍या विरोधात जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना उमेदवारी देण्‍याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र याबाबत अधिकृत विधान काँग्रेसकडून करण्‍यात आलेले नाही. (Loksabha Election 2024 : Satya Pal Malik May Contest Elections From Varanasi )

काँग्रेस मलिक यांना करणार निवडणूक लढविण्‍याचे आवाहन?

वाराणसी मतदारसंघातून माजी खासदार डॉ. राजेश मिश्रा यांनी निवडणूक लढवण्‍यास नकार दिला आहे. समाजवादी पार्टीचे नेते अथर जमाल लारी यांनी म्‍हटले आहे की, इंडिया आघाडतील चर्चेनुसार वाराणसी मतदारस संघ हा काँग्रेसकडे आहे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल मलिक यांना वाराणसीतून उमेदवारी देण्याचे आवाहन काँग्रेसकडून करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींवरील सातत्‍याने केलेल्‍या टीकेमुळे मलिक चर्चेत

सत्‍यपाल मलिक हे सध्‍या ७८ वर्षांचे आहेत. मागील दोन वर्ष ते सातत्‍याने पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्‍यावर टीका केल्‍याने चर्चेत राहिले आहेत. त्यांनी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यापासून ते गोव्यातील विविध भ्रष्टाचारांवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. विशेष म्‍हणजे जम्‍मू-काश्‍मीरचे राज्‍यपाल होण्‍यापूर्वी हे भाजपचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्षही होते. नुकतीच सीबीआयने त्‍यांच्‍यावर कारवाई केली. यावेळीही त्‍यांनी पुन्‍हा एकदा पंतप्रधान मोदींना लक्ष्‍य केले होते.

मेरठमधून आपल्‍या राजकीय कारकिर्दीला सत्‍यपाल मलिक यांनी प्रारंभ केला. चौधरी चरणसिंह यांच्‍या भारतीय क्रांती दलातून त्‍यांनी पहिली निवडणूक लढवली होती. यानंतर भारतील लोक दल आणि त्‍यानंतर काँग्रेसमध्‍ये त्‍यांनी प्रवेश केला. बोफोर्स घोटाळ प्रकरणानंतर त्‍यांनी १९८९ मध्‍ये काँग्रेसला सोडचिठ्‍ठी देत जनता दलात प्रवे केला. २००४ लोकसभा निवडणुकीपूर्वी त्‍यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर भाजपमध्‍ये विविध पदावर त्‍यांची नियुक्‍ती झाली. २०१७ मध्‍ये ते बिहारचे राज्‍यपाल झाले. यानंतर २०१८ मध्‍ये जम्‍मू-काश्‍मीर राज्‍यपालपदी त्‍यांची नियुक्‍ती झाली. ते राज्‍यापाल असतानाच जम्‍मू-काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्‍यात आले होते.

२०१९ मध्‍ये गोवा आणि त्‍यानंतर २०२० मध्‍ये मेघालयचे राज्‍यपाल म्‍हणून त्‍यांची नियुक्‍ती झाली. या निर्णयाने ते नाराज झाले. यानंतर त्‍यांनी भाजप सरकारविरोधात उघड टीका करण्‍यास सुरुवात केली. काश्‍मीमधील जलविद्युत प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला. तसेच पुलवामा हल्ल्यानंतर परिस्‍थिती हाताळण्‍यास केंद्र सरकार अपयशी ठरल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटले होते. २०२१ पासून ते सातत्‍याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टीका करत आहेत. आता सत्‍यपाल मलिक यांनी इंडिया आघाडीकडून वाराणसी मतदारसंघात उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरु असतानाच काँग्रेस पक्षाने यासाठी पुठाकार घ्‍यावा, असे आवाहन इंडिया आघाडीतील मित्रपक्ष समाजवादी पार्टीने केले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button