Loksabha Election 2024 : प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनीतीकार म्हणून उदय कसा झाला? ते नरेंद्र मोदींपासून का दुरावले? | पुढारी

 Loksabha Election 2024 : प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनीतीकार म्हणून उदय कसा झाला? ते नरेंद्र मोदींपासून का दुरावले?

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राजकीय सल्लागार या क्षेत्रातील उल्लेखनीय नाव आणि रणनीतीकार, अशी ओळख असणारे प्रशांत किशोर नेहमी चर्चेत असतात. २०११ मध्ये चर्चेत आलेले प्रशांत किशोर उर्फ ‘पीके’  चर्चेत असणारे रणनीतीकार आहेत. त्यांनी आतापर्यंत ज्या-ज्या निवडणुकांसाठी रणनीती आखली आहे, त्या-त्या निवडणुकांमध्ये त्यांनी यश मिळवले आहे.  नरेंद्र मोदी यांच्या जवळचे असणारे प्रशांत किशोर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र मोदींपासून दूर गेले, अशी चर्चा वारंवार होवू लागली. तर आपण प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनीतीकार म्हणून उदय कसा झाला? ते नरेंद्र मोदींपासून का दुरावले? सविस्तर पाहू. ( Loksabha Election 2024)

अशी सुरुवात झाली ‘निवडणूक रणनितीकार’ म्हणून….

प्रशांत किशोर हे संयुक्त राष्ट्र संघात सार्वजनिक आरोग्य तज्ञ म्हणून कार्यरत होते, संयुक्त राष्ट्र अंतर्गत त्यांनी भारत आणि आफ्रिकेत काम केले आहे. त्यांनी भारतातील महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि कर्नाटक या राज्यांमधील कुपोषण आणि आव्हान  परिस्थितीबाबत एक शोधनिबंध लिहला होता. शोधनिबंध प्रकाशित झाल्यानंतर ते नरेंद्र मोदींच्या नजरेत आले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रशांत किशोर यांना २०११ मध्ये पोषण निर्देशक सुधारण्यावर काम करण्यासाठी निमंत्रित केले. त्यानंतर प्रशांत किशोर दक्षिण आफ्रिकेतून थेट गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालय अर्थात गांधीनगरमधल्या स्वर्णिम संकुल-१ येथे दाखल झाले. यानंतर प्रशांत किशोर यांच्या  ‘निवडणूक रणनिती’ ला सुरुवात झाली.

 नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले….

प्रशांत किशोर आणि नरेंद्र मोदी यांचे संबध दिवसेंदवस दृढ होत गेले. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप प्रचार तंत्राचे प्रशांत किशाेर अविभाज्य भाग बनले. गुजरात विधानसभा २०१२ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचा विजय झाला. ते तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. ही निवडणूक जिंकताच प्रशांत किशोर आणि नरेंद्र मोदी यांनी काहीतरी मोठे करण्याकडे लक्ष दिले.

२०१४ ची सावर्वत्रिक निवडणूक आणि कॅगची स्थापना

२०१४ ला सार्वत्रिक निवडणूक होती. या निवडणुकीत नरेंद्र मोदींना भाजपचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान पदाचे दावेदार, त्यांची विकास समर्थक , सरकारची एकमेव आशा, अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी देशव्यापी ब्रॅंडिग मोहीम सुरु करण्यात आली. यातून प्रशांत किशोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१४ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी २०१३ मध्ये कॅग (CAG-Citizens for Accountable Governance ) या गैर-सरकारी प्रचार कंपनीची स्थापना केली. दरम्यान २०१२-१३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी आयटी कंपन्या आणि सल्लागार कंपन्यांमधील नोकऱ्या सोडणाऱ्या अनेकांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काय करता येईल आणि निवडणूक प्रचारात ते कसे योगदान देऊ शकतील याच्या कल्पना मांडल्या. जे लोक पात्र आहेत त्यांचे प्रस्ताव येत होते. मात्र सर्वांना एकत्र आणण्यासाठी आणि नंरेद्र मोदी पंतप्रधान या मोहिमेला धोरणात्मक दिशा देण्यासाठी एक नविन संस्था स्थापन करावी, असा प्रस्ताव होता. नरेंद्र मोदींनी याच नेतृत्व प्रशांत किशोर यांच्याकडे दिले. त्यानंतर सर्वांना कॅगच्या  छताखाली एकत्र केले. आणि या कंपनीअंतर्गत २०१४ सालच्या भाजपची प्रचारमोहीम चालवली गेली.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणूक प्रचार दरम्यान विविध कार्यक्रमांचा, क्लृप्त्यांचा वापर केला गेला. यामध्यये रन फॉर युनिटी, श्रेष्ठ भारत, मंथन, थ्रीडी होलोग्राम सभा, चाय पे चर्चा आदी. मंथन या अंतर्गत भारतातील आघाडीच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र आणले, पण यातील ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाची चर्चा मात्र देशभरात झाली.  या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.

 Loksabha Election 2024 : प्रशांत किशोर-भाजप फारकत?

२०१४ निवडणुकीत अभूतपूर्व विजयानंतर श्रेयाच्या लढाईत CAG ने घेतलेल्या भूमिकेवर भाजप नेते यांच्यात वाद असला तरी, हे स्पष्ट आहे की या कॅग आणि किशोर यांनी स्वतः मोदींच्या वैयक्तिक ब्रँडिंगचे अनेक भाग हाताळले आणि त्यांची प्रतिमा हिंदू कट्टरपंथीयातून बदलली आणि ‘विकासपुरुष’ अशी प्रतिमा निर्माण झाली.

२०१४ मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर. किशोर यांना पंतप्रधान मोदींचे विश्वासू म्हणून त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आणि लवकरच त्यांना नवीन प्रशासनात कोणतीही भूमिका नसल्याचे दिसून आले. किशोर यांना राजकीय पदाची अपेक्षा हे कारण असावे असा अंदाज वर्तवला जावू लागला. तत्कालीन परिस्थिती पाहता कॅग ही खूप पैसे कमावणारी कंपनी नव्हती. काही हजारांच्या तुटपुंज्या स्टायपेंडवर काम करण्यासाठी महिन्याला लाखो पगार सोडून एका कारणासाठी पुढे आलेला हा बांधील स्वयंसेवकांचा गट होता. पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांचे प्रतिफळ त्यांना मिळेल, अशी बहुतेक पक्ष कार्यकर्त्यांप्रमाणेच गटातील अनेकांची कल्पना होती. पण असे कधीच घडले नाही आणि किशोर आणि भाजपमधील तेढ वाढत गेली. दरम्यान अमित शहा यांना भाजप अध्यक्षपदी पदोन्नती मिळाली. याचेही श्रेय प्रशांत किशोरला दिले जावू लागले. पण अमित शाह गटाला  किशोरपासून धोका असल्याचे बोलले जावू लागले. अमित शाह आणि प्रशांत किशोर यांच्यातील वाद, नाराजी बद्दल अनेक गोष्टींवर चर्चा होवू लागली. पण दोघांनीही कधी याला दुजोरा दिला नाही.

 Loksabha Election 2024 : मी बिहारचा मार्ग निवडला आहे…

नुकतीच एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांना प्रश्न विचारला की, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याचा विचार करत आहात का? तर यावर बोलताना ते असे म्हणाले की, “आता त्यांना आमच्यासारख्य़ा लोकांची गरज नाही. आता ते पंतप्रधान झाले आहे. आता आमचा मार्ग वेगळा आहे. आता मी बिहारचा मार्ग निवडला आहे. “

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर उर्फ पीके यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर वेगळे झाले. याबाबत एका मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर यांनी खुलासा केला आहे की, “त्यावेळी निवडणूक आणि प्रशासनासाठी प्रस्तावित केलेल्या विशेष व्यावसायिक सेटअप किंवा मॉडेल्सबाबत दोन्ही बाजूंमध्ये कोणताही करार झालेला नव्हता. निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी जे काही मान्य केले होते, ते पंतप्रधान झाल्यानंतर ते पूर्ण करू शकले नाहीत.” यावेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, नरेंद्र मोदी निवडणूक जिंकून पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना ना पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) थेट प्रवेश हवा होता किंवा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी त्यांचे कोणतेही भांडण नव्हते.

(या लेखासाठी How to win an Indian election या पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करण्यात आला आहे.)

हेही वाचा 

Back to top button