पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने आज त्यांच्या जागावाटपासंबंधीचे पहिले अपडेट दिले आहे. आज (दि. २) पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते विनोद तावडे यांनी याबाबत पहिली यादी जाहीर केली आहे. (Lok Sabha Election 2024)
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक गुरुवारी (दि. २९) दिल्लीतील पक्ष कार्यालयात झाली. पक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. मध्यरात्री तीन वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची नावे निश्चित केल्याची औपचारिक घोषणा आज (दि. २ मार्च) झाली. पहिल्या यादीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, स्पीकर यांची नावे आहेत. (Lok Sabha Election 2024)
१९५ पैकी जणांच्या यादीत २ माजी मुख्यमंत्र्यांची नावे आहेत, २८ महिला तर ४७ तरुण असतील अशी माहिती देखील तावडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर एकूण ३४ मंत्री निवडणूकीच्या रिंगणात असतील. अनुसुचित जमातीमधून १८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)
उत्तर प्रदेश मधून ५१, तेलंगणामधून ९, आसाममधून १४, पश्चिंम बंगालमधून २०, मध्यप्रदेश मधून २४, आसाम, झारखंड आणि छत्तीसगड मधून प्रत्येकी ११, दिल्लीतून ५, जम्मू आणि काश्मिरमधून २, केरळमधून १२, अरुणाचल प्रदेशमधून २ आणि गोवा, त्रिपुरा, अंदमान-निकोबार, दमण-दिव येथून प्रत्येकी १ अशा राज्यनिहाय जागा असतील.
पीएम मोदी हे वाराणसीतून निवडणूक लढवतील तर अमित शहा हे गांधीनगरमधून निवडणूक लढवतील, ओम बिर्ला हे कोटामधून, गोव्यातून श्रीपाद नाईक, अलवरमधून भुपेंद्र यादव, स्मृती इराणी अमेठीतून तर हेमा मालिनी मथुरामधून निवडणूक लढवतील. हे उमेदवार असतील अशी माहिती देण्यात आली आहे. या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचे नाव नाही. (Lok Sabha Election 2024)
भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या या पहिल्या यादीत दिग्गज नेत्यांची नावे आहेत. १९५ नावांच्या जागावाटपासंबंधितची ही यादी आहे. ज्या ठिकाणच्या जागा आज निश्चित झालेल्या आहेत त्याठिकाणी पक्ष प्रचाराला वेग येणार आहे. अब की बार ४०० पार असा नारा भाजपने ठेवलेला आहे. त्यानुसार भाजप कसून तयारी करत आहे. या १९५ जणांमध्ये प्रामुख्याने भाजपने २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गमावलेल्या जागांवरील उमेदवारांची नावे सर्वाधिक आहेत. जेणेकरून येथील पक्षाच्या उमेदवारांना तयारीसाठी जास्तीत जास्त वेळ मिळू शकेल, असे भाजप सुत्रांचे म्हणणे आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही वाचा