Lok Sabha Election : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात | पुढारी

Lok Sabha Election : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात

प्रवीण सोनावणे

ठाणे : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. ज्या पाच मतदारसंघांवर वाद आहे, ते वगळून 42 मतदारसंघांवर ‘मविआ’त एकमत झाले आहे. ठाकरे गट हा मोठा भाऊ म्हणून पुढे आला असून, ठाकरे गटाला 20 जागा दिल्या जाणार आहेत. त्या खालोखाल 18 जागा काँग्रेस आणि 8 जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहेत. वंचित बहुजन आघाडीला ठाकरे गटाच्या कोट्यातील जागा दिल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वंचित आघाडीला ठाकरे गट 3 ते 4 जागा देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 10 जागांपैकी स्वाभिमानी संघटनेला एक जागा, तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला 2 जागा दिल्या जाणार आहेत. काँग्रेसच्या गोटातून कवाडे गटाला एखादी जागा दिली जाऊ शकते.

ठाकरे गटाकडे कोकणातील पालघर, कल्याण, ठाणे, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मावळ अशा तब्बल 9 जागा दिल्या गेल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रातील 5 जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेसला पुणे, कोल्हापूर, सांगली, नागपूर अशा महत्त्वाच्या जागा मिळाल्या. ज्या 5 जागांचा तिढा आहे त्यामध्ये रामटेक, हिंगोली, जालना, मुंबई दक्षिण मध्य, शिर्डी या जागांचा समावेश आहे. शिर्डीची जागा राष्ट्रावादी काँग्रेस लढवणार आहे. अजित पवार गटात असलेले नीलेश लंके यांना शरद पवार गटात आणून शिर्डीच्या जागेवर उमेदवारी दिली जाऊ शकते, तर दक्षिण मध्य मुंबईत प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी मिळू शकते.

हा मतदारसंघ पूर्वी एकनाथ गायकवाड यांच्या ताब्यात होता. ते काँग्रेसमधून निवडणूक लढवत होते. मात्र, धारावीसारख्या भागात मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदार मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी आंबेडकर उभे राहू शकतात. कोल्हापूरची जागा ठाकरे गटाकडे असली, तरी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीने उमेदवारी देऊ केली आहे. काँग्रेसने युवा उमेदवारांना उमेदवारी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे, पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्यासह 8 ते 9 मतदारसंघात तरुण चेहरे दिले जाणार आहेत. कोकण भागात दबदबा कायम राहावा, यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. त्यामुळे तब्बल 9 जागा ते लढवणार आहेत.

Back to top button