Lok Sabha election 2024 : काँग्रेस-आपची ‘हात’मिळवणी, शीला दीक्षितांचे ‘ते’ भाकीत चुकलेच! | पुढारी

Lok Sabha election 2024 : काँग्रेस-आपची 'हात'मिळवणी, शीला दीक्षितांचे 'ते' भाकीत चुकलेच!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : “आम्‍ही आम आदमी पार्टीला (आप) आमच्‍या हक्‍काच्‍या मतदारसंघांमध्‍ये शिरकाव करण्‍याची संधी दिली. यामुळेच आम्‍ही दिल्‍लीतील सत्ता गमावली.आम्‍हाला दिल्‍लीत पुन्‍हा सत्ता काबीज करायची असेल तर प्रथम ‘आप’ला पराभूत करावे लागेल. त्‍यांनी आमच्‍याकडून जे काही हिसकावले आहे ते परत मिळवावे लागेल. यानंतर आम्‍ही भाजपचा मुकाबला करु. आमच्‍या दृष्‍टीने भाजप नव्‍हे तर आप प्रथम क्रमाकांचा विरोधी पक्ष आहे.” २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील नामुष्‍कीजनक पराभवाचे विश्‍लेषण करताना दिल्‍लीच्‍या माजी मुख्‍यमंत्री आणि ज्‍येष्‍ठ नेत्‍या शीला दीक्षित यांनी असे भाकित केले होते. मात्र अवघ्‍यापाच वर्षांमध्‍ये त्‍यांनी केलेले भाकित पूर्णपणे चुकले आहे. कारण राजकीय अपरिहार्यतेमुळे आज एकेकाळी पक्‍के राजकीय विरोधक काँग्रेस आणि आप आता भाजपविरोधात एकवटले आहेत.

दोन दशकांपूर्वी दिल्‍ली शिला दीक्षित म्‍हणजे काँग्रेसच विजय, इतके पक्‍के राजकीय समीकरण होते. १९९८ मध्‍ये काँग्रेसची केंद्रात सत्ता नव्‍हती तरीही त्‍यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली काँग्रेसने विजय मिळवला. शीला दीक्षित मुख्‍यमंत्री झाल्‍या. यानंतर पुढील दोन विधानसभा निवडणुकीत त्‍यांनी सत्ता अबाधित ठेवत त्‍या सलग १५ वर्ष दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्री राहिल्‍या . दिल्‍ली त्‍यांच्‍या सरकारने केलेल्‍या विकास कामे सर्वात जेमेची बाजू होती. त्‍याचबरोबर दिल्‍लीतील अल्‍पसंख्‍यांकांचे प्राबल्‍य असणार्‍या मतदारसंघांमध्‍ये काँग्रेसचे वर्चस्‍व होते.

दिल्‍लीत ‘आप’ उदय आणि काँग्रेसच्‍या अस्‍तित्‍वाची लढाई सुरु

२०११ मध्‍ये तत्‍कालिन काँग्रेस नेतृत्त्‍वाखालील संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारवरील भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपाविरोधात ज्‍येष्‍ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांनी बेमुदत उपोषण केले. या आंदोलनावेळी जे चेहरे समोर आले त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने अरविंद केजरीवाल हे नाव समोर आले. भ्रष्‍टाचारविरोधी आंदोलनानंतर त्‍यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली आम आदमी पक्षाची स्‍थापना झाली. बघता बघता या पक्षाने दिल्‍लीतील काँग्रेसच्‍या अस्‍तित्‍वालाच सुरुंग लावला. आपने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत २०१३ मध्‍ये दिल्‍लीतील सत्ता हाती घेतली.

केजरीवालांनी केला होता शीला दीक्षितांचा पराभव

२०१४ विधानसभा निवडणुकीत ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल शीला दीक्षित यांच्‍याविरोधात मैदानात उतरले. केजरीवाल यांचा नेहमीप्रमाणे हा प्रसिद्धीसाठीचा स्‍टंट आहे, असा दावा काँग्रेसने केला. या निवड‍णुकीत शीला दीक्षित यांचा २५ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला. हा पराभव त्‍यांच्‍या जिव्‍हारी लागला. यावेळी त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या की, “मागील १५ वर्षामंध्‍ये मी दिल्‍लीत विविध विकास कामे केली. या विकास कामांमुळे दिल्‍लीतील नागरिकांचे जीवनमान सुधारले. मात्र दिल्‍लीतील नागरिक आम आदमी पार्टीच्‍या खोट्या अभियानाला बळी पडले.”

‘प्रथम ‘आप’चा पराभव करु नंतर भाजपबाबत ठरवता येईल’

२०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीतही सलग दुसर्‍यांदा काँग्रेसला नामुष्‍कीजनक पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर शीला दीक्षित यांनी काँग्रेसला दिल्‍लीत आपले अस्‍तित्‍व टिकविण्‍यासाठी भाजप नव्‍हे तर आपचा पराभव करावा लागेल, असे म्‍हटले होते. आपचा पराभव केल्‍यानंतर भाजपबाबत ठरवता येईल, असे त्‍यांनी म्‍हटले होते. मात्र मागील काही वर्षात देशभरात भाजपने मारलेले मुसंडीमुळे विरोधी पक्षांना एकत्र येण्‍याची वेळ आली आहे. आता भाजपचा पराभव करण्‍यासाठी राजकीय अपरिहार्यता म्‍हणून काँग्रेसला ‘आप’बरोबर युती करावी लागली आहे. प्रमुख राजकीय विरोधक आता भाजपविरोधात एकत्र आले आहेत. आता दिल्‍लीबरोबरच काँग्रेस आणि आप युती गुजरात, हरियाणा, चंदीगड आणि गोवा या राज्‍यांमध्‍ये लोकसभा निवडणूक एकत्र लढविणार आहेत. राजकारणातील विरोधकाला मित्र करण्‍याचे आणखी एक वर्तुळ यानिमित्त काँग्रेसने पूर्ण केले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button