Lok Sabha Election 2024 | ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ वाढवतेय ‘भाजप’चा टक्का? जाणून घ्या महिला मतांचे गणित | पुढारी

Lok Sabha Election 2024 | 'टॉयलेट एक प्रेमकथा' वाढवतेय 'भाजप'चा टक्का? जाणून घ्या महिला मतांचे गणित

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2019ची लोकसभा भाजपने जिंकली. बालाकोटचा एअर स्ट्राईक भाजपला फायद्याचा ठरला, यात काही शंका नाही. पण या एकाच कारणामुळे भाजपने निवडणूक जिंकली होती, असे मात्र म्हणता येत नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला एअर स्ट्राईक होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप एक वर्ष नेमका कशाचा प्रचार करत होते? महिला वर्गाला आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने कोणते मुद्दे हाती घेतले होते? हे पाहावे लागेल. भारतीय राजकारणात महिलांची मते कशी निर्णायक ठरत आहेत, आणि निवडणुका जिंकण्यासाठीच्या रणनीतीत ‘महिला मतदार’ हा फॅक्टर कसा महत्त्वाचा ठरत आहे, हे पाहावे लागेल. (Lok Sabha Election 2024)

महिलांचा मतदानातील वाढता टक्का | Lok Sabha Election 2024

२०१९ला झालेल्या मतदानात महिलांची मते ६६.६८ टक्के होती, तर पुरुषांची मते थोडी जास्त म्हणजे ६६.७९ इतकी होती. गेल्या सत्तर वर्षांतील महिलांची मतदानातील ही सर्वांत मोठी टक्केवारी होती. आपण या ठिकाणी काही भूतकाळातील उदाहरणे पाहू. १९६२ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत महिलांचे मतदान फक्त ४७ टक्के राहिले होते. तर २०१४ येईपर्यंत ही टक्केवारी ६६ टक्के इतकी झाली, म्हणजेच तब्बल १९ टक्केंची वाढ. पण या काळात पुरुषांची मते मात्र ६२ टक्केवरून फक्त ६७ टक्केपर्यंत वाढली म्हणजे फक्त ५ टक्केंची वाढ!

विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांत महिलांचा टक्का अधिक वाढलेला आहे. The Pro Incumbency Century या पुस्तकात २०१७ ते २०१८मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा जास्त राहिल्याची नोंद केली आहे. शहरी भागांशी तुलना करता ग्रामीण भागातील महिलांचे मतदान ६ टक्केंनी जास्त राहिले आहे. १९७१ मध्ये या उलट स्थिती होती. या वर्षी शहरी महिलांचे मतदान ग्रामीण महिलांशी तुलना करता ८ टक्केंनी जास्त होते. महिलांची मतदानातील टक्केवारी वाढत असल्याने राजकीय पक्ष आता निवडणूक जिंकण्यासाठीच्या त्यांच्या रणनीतीमध्ये महिला मतदरांचा फार काळजीपूर्वक विचार करत आहेत.

‘टॉयलेट एक प्रेमकथा’

बालाकोटवरील एअर स्ट्राईक २६ फेब्रुवारी २०१९ला झाला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निवडणुकांचा प्रचार एक वर्ष आधीच सुरू झाला होता. या वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतागृह आणि शौचालयांमुळे महिलांच्या आत्मसन्मात भर पडल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. याशिवाय उज्ज्वला योजनेमुळे महिलांना गॅस सिलिंडर मिळाले होते, त्यांना स्वयंपाकासाठी आता रॉकेल, लाकूड, कोळसा यावर अवलंबून राहावे लागत नाही, हाही मुद्दा वारंवार मांडला गेला होता. जोडीने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (थेट लाभ हस्तांतर) याचाही फायदा महिला वर्गांना होत होता. स्वच्छ भारत मिशनवरील २००० ते २०२०पर्यंतची आकडेवारी पाहिले तर खुल्यावर शौच करण्याचा टक्का २०२०मध्ये सर्वांत खाली आलेला होता.

या योजनांचा फार मोठा लाभ भाजपला झाला आणि भाजपच्या खासदारांची संख्या २०१९ला ३००च्या पुढे जाऊ शकली, असे The Pro Incumbency Century या पुस्तकात नमुद करण्यात आले आहे. निती आयोगाने (NITI AAYOG) देशातील ११५ जिल्ह्यांची निवड Aspirational या कार्यक्रमासाठी केलेली आहे. या जिल्ह्यांच्या अंतर्गत येत असलेल्या ६० टक्के म्हणजे जवळपास ७१ लोकसभा मतदारसंघात भाजपची आघाडी असल्याचेही या पुस्तकात म्हटले आहे.

महिला सबलीकरण ठरतेय कळीचा मुद्दा

निवडणुकात महिलांची मते आता निर्णायक ठरत असल्याने नोकरी, निवडणुकांत महिलांना आरक्षण याचाही फायदा पक्षांना होत आहे. एकूणच महिला सबलीकरण हा भारतीय राजकारणात, निवडणुकांत अत्यंत महत्त्वाच घटक बनू लागलेला आहे.

अर्थात महिलांसाठीच्या योजना राबवणारा भाजप हा एकमेव पक्ष नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी २००७मध्ये शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी मोफत सायकली वाटल्या होत्या आणि मुलींना गणवेशही मोफत दिले होते. मध्य प्रदेशातील लाडली लक्ष्मी योजना, लाडली बहना आवास योजना सुरू केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी कन्यश्री प्रकल्प, मुलांनी सायकल, रुपश्री प्रकल्प अशा योजना राबवल्या आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी पश्चिम बंगलामधील महिला मतदारांच्या आवडीच्या नेत्या ठरतात. लोकनीती या संस्थेने २०१९मध्ये पश्चिम बंगालमध्ये एक पाहाणी केली होती, यात ४७ टक्के महिलांनी ममता बॅनर्जी यांना मतदान केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेक लोकसभेत महिलांना आरक्षण देण्याचा निर्णयाचा येथे उल्लेख करावा लागेल.

(या लेखासाठी The Pro Incumbency Century या पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करण्यात आला आहे.)

हेही वाचा

Back to top button