पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय निवडणूक प्रक्रियेत पुरूष आणि महिला या दोन घटकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. भाारताला पुरूषप्रधान संस्कृती असलेला देश मानले जाते. त्यामुळे अजूनही भारतीय समाजांमध्ये बहुतांशी प्रमाणात 'स्त्री'पेक्षा पुरूषानाच अधिक महत्त्व, अधिकार आणि हक्क आहेत. गावपातळीवरील राजकारणाचा विचार करता, एखादी महिला सरपंच असेल तर ती केवळ नावापुरतीच असते पण सर्व कारभार तिचा नवराच पाहतो. त्यामुळे भारतीय लोकशाहीतील निवडणूक मतदान प्रक्रियेत 'स्त्री'या पुरूषांचा सल्ला घेतात का? किंवा कोणत्या पक्ष किंवा उमेदवाराला मतदान करायचे? याबाबत नवऱ्याचा आदेश मानतात का? यासंदर्भात निवडणुकांचा अभ्यास काय सांगतो? जाणून घेऊया… (Lok Sabha Election 2024)
भारत हा पुरुष प्रधान समाज आहे असे मानणाऱ्यांचे डोळे उघडणारा रिपोर्ट 'The Verdict, Decoading Indias Election' या पुस्तकात दिला आहे. एका सर्वेक्षणामध्ये ' कोणत्या पक्ष किंवा उमेदवाराला मतदान करायचे, हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला विचारता का? असा प्रश्न महिलांना विचारण्यात आला. तेव्हा महिलांनी या प्रश्नाला प्रामुख्याने हसत प्रतिसाद दिला. या प्रश्नाला उत्तर देताना अनेक महिला म्हणाल्या की, " मी कोणाला मत द्यायचे याबाबत मी त्यांचे (नवऱ्याचे) ऐकेन असे ते विचार करत असतील, परंतु हा त्यांचा (नवऱ्याचा) समज असेल. "मला ज्याला मत द्यायचे आहे, मी त्यालाच मतदान करते. भारतीय महिलांचा स्वावलंबनाचा हा स्पष्ट सूर आम्ही गेल्या दहा वर्षांपासून देशातील आणि राज्यांतील निवडणुकांत ऐकत असल्याचे "The Verdict, Decoading Indias Election" या पुस्तकात नमूद केले आहे. (Lok Sabha Election 2024)
सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजनुसार, (CDS) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७० टक्के मतदान केलेल्या महिला मतदारांनी सांगितले की, "निवडणुकीत मतदान कोणाला द्यायचे, याबाबत त्यांनी आपल्या पतींचा सल्ला घेतला नाही". यावरून स्वतंत्र विचार करणाऱ्या महिला मतदारांची संख्या ही सर्वाधिक असल्याचे स्पष्ट होते. तसेच महिला मतदारांमध्ये ज्या स्वत:चे मत तयार करू शकतात, त्यांचे प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असल्याचे देखील या निवडणक अभ्यासातून स्पष्ट करण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024 )
लोकसभा निवडणुका २०१९ मध्ये महिला मतदानांची मते ६६.६८ टक्के होती, तर पुरुषांची मते यापेक्षा थोडी जास्त म्हणजे ६६.७९ इतकी होती. गेल्या सत्तर वर्षांतील २०१९ मधील महिलांची मतदानातील ही सर्वांत मोठी टक्केवारी होती. आपण या ठिकाणी काही भूतकाळातील उदाहरणे पाहू. १९६२ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत महिलांचे मतदान फक्त ४७ टक्के राहिले होते. तर २०१४ येईपर्यंत ही टक्केवारी ६६ टक्के इतकी झाली, म्हणजेच तब्बल १९ टक्केंची वाढ. पण या काळात पुरुषांची मते मात्र ६२ टक्केवरून फक्त ६७ टक्केपर्यंत वाढली म्हणजे फक्त ५ टक्केंची वाढ होती!
(या लेखासाठी लेखक प्रणोय रॉय, दोराब सुपारीवाला यांच्या "The Verdict, Decoading Indias Election" या पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करण्यात आला आहे.)