न्यायपालिकेचे हल्ल्यांपासून संरक्षण करा : सरन्यायाधीश | पुढारी

न्यायपालिकेचे हल्ल्यांपासून संरक्षण करा : सरन्यायाधीश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ; हेतूत: होणार्‍या हल्ल्यांपासून न्यायपालिकेचे संरक्षण करा, असे आवाहन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी शुक्रवारी संविधानदिनी वकिलांना केले. वकील आणि न्यायाधीश हे एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहेत. कारण, त्यांना जनतेने न्यायालयाचे अधिकारी म्हणून स्वीकारले आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, नेहमी सत्याच्या बाजूने राहा. जे चुकीचे आहे त्याच्याविरोधात भक्कमपणे उभे राहण्यास कचरू नका.

आपण या व्यवस्थेचा भाग असल्याचा मला अत्यंत आनंद आहे. या व्यवस्थेने स्वातंत्र्यलढ्यात खूप काही दिले आहे. संविधानाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, सरदार पटेल आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांसारख्या वकिलांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. त्यांचे जनतेप्रती समर्पण आणि त्याग महान आहे. त्या गौरवशाली वारशाचे आपण सर्वजण उत्तराधिकारी आहोत. याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे.

Back to top button