Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक घोषणा १३ मार्चनंतर | पुढारी

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक घोषणा १३ मार्चनंतर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असतानाच या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम 13 मार्चनंतर जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हालचालींना या पार्श्वभूमीवर वेग आला आहे. (Lok Sabha Election 2024)

सध्या निवडणूक आयोगाकडून विविध राज्यांमध्ये मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या नियमित बैठका घेतल्या जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांना कोणत्या सुविधांची गरज आहे आणि कोणत्या अडचणी येऊ शकतात याची माहिती जाणून घेतली जात आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स अर्थात इव्हीएम्स, सुरक्षा रक्षकांची गरज, राज्यांच्या सीमांवर देखरेखीसाठीची तयारी यासारख्या बाबींचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाचे पथक सज्ज

निवडणूक आयोगाचे पथक सज्ज झाले असून ते पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये पुढील आठवड्यात भेट देणार आहे. जम्मू आणि काश्मीरलाही हे पथक 13 मार्च रोजी भेट देणार असल्याची माहिती आहे. 13 मार्चपर्यंत सर्व राज्यांत निवडणूक तयारी पूर्ण होण्याची शक्यता द़ृष्टिपथात आली आहे. त्यामुळे 13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

मतदारांच्या संख्येत 6 टक्के वाढ

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 96.88 कोटी मतदार पात्र ठरले आहेत. यामध्ये 6 टक्क्यांनी नव्या मतदारांची वाढ झाली आहे. याखेरीज 1.85 कोटी युवक यावेळी प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही माहिती नुकतीच निवडणूक आयोगाने जाहीर केली होती.

घरी बसूनही मतदान करता येणार

या निवडणुकीत प्रथमच 80 वर्षांवरील व्यक्ती आणि दिव्यांगांना घरी बसून मतदान करता येणार आहे. यासाठी परवानगी देण्यात आल्याची राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे. निवडणूक जाहीर झाली की, या लोकांना पर्याय दिले जातील. त्यासाठी त्यांना फॉर्म डी घरपोच फॉर्म दिला जाणार आहे. यापूर्वी कसबा पोटनिवडणुकीत घरी बसून मतदान करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे घरातूनच व्हिडीओ रेकॉर्ड करून मतदान करणे शक्य होणार आहे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Back to top button