Lok Sabha Election 2024 | श्रीमंत नव्हे गरीब मतदार ठरवतात त्यांचा नेता कोण?; जाणून घ्या देशातील मतदानांचा ट्रेंड | पुढारी

Lok Sabha Election 2024 | श्रीमंत नव्हे गरीब मतदार ठरवतात त्यांचा नेता कोण?; जाणून घ्या देशातील मतदानांचा ट्रेंड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय राज्यघटनेने देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदान करण्याचा एक महत्त्वाचा अधिकार प्रदान केलाय. गेल्या काही निवडणुकांवर नजर टाकल्यास ग्रामीण भारतात अधिक मतदान आणि शहरात कमी असे चित्र दिसून आले. जे ग्रामीण भागातील तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचले. त्यांच्या समस्या हाताळल्या. त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविल्या. असे नेते दीर्घकाळ सत्तेत राहिले आहेत. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या दिग्गजांनी हा ट्रेंड पाहून, त्यानुसार त्यांच्या शासनाचे मॉडेल तयार केले, असा संदर्भ निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांनी त्यांच्या ‘हाउ इंडिया व्होट्स अँड व्हॉट इट मीन्स’ या त्यांच्या पुस्तकात दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

समाजातील वंचित घटक हे निश्चित करतात की जे कोणी त्यांच्या समस्या सोडवतील आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतील अशा पक्षाला अथवा उमेदवाराला मत देऊ. ते न चुकता त्यांचा मतदानाचा हक्क बजावतात. कारण ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि निवडून आलेल्या सरकारवर अवलंबून असतात. ते अनेक योजनांचे लाभार्थी असतात. ते जेव्हा अडचणीत असतात तेव्हा ते पहिल्यांदा लोकप्रतिनिधींकडे धाव घेतात. त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, या अपेक्षेने ते स्थानिक लोकप्रतिनिधींकडे जातात. श्रीमंतांना मात्र असे सरकारवर अवलंबून रहावे लागत नाही आणि त्यांच्यासाठी मतदान हे सर्वोच्च प्राधान्य नसते. ते सोयीचे असेल तरच मतदान करतात. यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण मतदारांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

भारतात गरीब आणि श्रीमंत ही दरी धक्कादायक आहेच. त्याचसोबत संपत्तीबाबतही विषमता आहे. भारतातील केवळ ६ टक्के कर्मचारी आयकर रिटर्न भरतात. देशभरातील वंचित लोक तत्परतेने मतदानाचा हक्क बजावत असताना, त्या प्रदेशाच्या भूगोलाचाही मतदानाच्या पॅटर्नवर परिणाम होतो. मतदानाच्या ट्रेंडवर नजर टाकल्यास हे दिसून येते की ग्रामीण भागातून एखादे लहान शहर आणि तेथून मोठ्या शहराकडे आणि मेट्रोमध्ये जाताना मतदारांच्या मतदानाची टक्केवारी हळूहळू कशी कमी होते. याचे एक उदाहरण पुस्तकात दिले आहे.

मतदानाचे आकडेवारी काय सांगते?

महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी या ग्रामीण मतदारसंघात ७०.३५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर अलिशान कुलाब्यात केवळ ४० टक्के मतदान झाले होते. २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तुमकूर ग्रामीणमध्ये ८५.४१ टक्के मतदान झाले होते. तर बंगळूर दक्षिणमध्ये ५२.८६ टक्के मतदान झाले होते. डिसेंबर २०१८ मधील मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तब्बल ७४.६१ टक्के होती. त्या तुलनेत महाराष्ट्राच्या २०१९ विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी केवळ ६१.१३ टक्के होती.

याचे एक कारणदेखील आहे की मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित कामगारांची मोठी संख्या असते. त्यांना वैध पत्ता अथवा ओळखीचा पुरावा नसल्यामुळे त्यांना कागदपत्रे एकत्र ठेवणे कठीण जाते. पण ग्रामीण भागात राजकीय पक्षाना जनसमुदाय एकत्र करणे सोपे जाते. शहरात हे सहजासहजी शक्य होत नाही.

सार्वत्रिक निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी

२०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीवर नजर टाकल्यास देशभरातील मतदानाची टक्केवारी ६७.११ एवढी होती. देशात ७० टक्के मतदार ग्रामीण आहेत आणि उर्वरित शहरी आहेत. या ७० टक्क्यांपैकी अंदाजे ७५ टक्के मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडले. संपूर्ण भारतात हे प्रमाण ५२ टक्के आहे. शहरी भागात सरासरी मतदान साधारणतः ५० टक्के असते. जे संपूर्ण भारतात १५ टक्के होते, जे अंदाजे ६७ टक्क्यांपर्यंत पोहोचते.

सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण?

इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांसारख्या दिग्गज नेत्यांनी हा ट्रेंड पाहून त्यानुसार त्यांच्या शासनाचे मॉडेल तयार केले. या मतदारांपर्यंत जे पोहोचले ते नेते खूप दीर्घकाळ सत्तेत राहिले. उदा. जवाहरलाल नेहरू, ज्योती बसू आणि इंदिरा गांधी. १९९० च्या दशकात ‘इंडिया टुडे’ने भारतातील त्या काळापर्यंतचा सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण? यावर सर्वेक्षण केले होते. त्यात नेहरु सर्वोत्कृष्ट ठरले. ते त्यांच्या काळात लोकप्रिय राहिले आणि त्यांचा गरीबांच्या हिताच्या बाबतीत असलेला दृष्टिकोन हे मागील कारण असू शकते.

‘त्यांचे’ व्होटबँकेकडे लक्ष राहिले

ज्योती बसू, नवीन पटनाईक, माणिक सरकार, एम. जी. रामचंद्रन, रमण सिंह, शिवराज सिंह चौहान, जयललिता आणि नरेंद्र मोदी हे नेते मुख्यमंत्री म्हणून पुन्हा पुन्हा सत्तेवर आले. कारण त्यांनी गरिबांचे प्रश्न हाताळले. त्यांचा गरिबांच्या कल्याणकारी योजनांवर भर राहिला. त्यांनी कधीही या व्होटबँकेकडे दुर्लक्ष केले नाही. (Lok Sabha Election 2024)

(या लेखासाठी How India Votes And What It Means या पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करण्यात आला आहे.)

हे ही वाचा :

Back to top button