पुढारी ऑनलाईन डेस्क : किमान हमी भाव व अन्य मागण्यांसाठी शेतकरी पंजाब-दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारशी चर्चा सुरू असतानाच आज (दि.२१) शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चाची हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते आणि सदस्यांनी सकाळपासून शंभू आणि खनौरी सीमेवर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी हायड्रोलिक क्रेन, जेसीबी, पोकलेन अशी अवजड यंत्रसामग्री शंभू सीमेवर आणण्यात आली आहे. दरम्यान, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्याचे आदेश दिले आहेत. ( Farmer's protest : Delhi march resumes today; security beefed up on borders )
शेतकरी शंभू सीमेवर जमू लागले असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिल्लीकडे कूच करण्याचे जाहीर केले आहे. शेतकरी नेते काका सिंह कोटरा यांनी सांगितले की, "आमच्या सर्व संघटनांची बैठक झाली. कोणत्या ठिकाणाहून कोण जाणार याचे नियोजन झाली आहे. सरकारने मागणी मान्य न केल्यास आम्ही दिल्लीकडे जाण्यासाठी मोर्चा काढू." दरम्यान, पंजाब-दिल्ली सीमेवर पंजाब पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
आंदोलकांच्या दिल्ली चलो आंदोलनादरम्यान शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले, मोर्चात कोणताही शेतकरी किंवा तरुण आंदोलनात पुढे जाणार नाही. नेते आघाडीवर असतील. आम्ही शांततेने जाऊ. केंद्र सरकारने एमएसपीवर कायदा केल्यास हे सर्व संपुष्टात येऊ शकते.
शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले की, कोणत्याही प्रकारची अराजकता निर्माण करण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही 7 नोव्हेंबरपासून दिल्लीला पोहोचण्याची योजना आखली आहे. आता सरकारला पुरेसा वेळ मिळाला नाही, असे सरकार म्हणत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट होतो की. ते आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला रोखण्यासाठी मोठमोठे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. सरकारने ती बॅरिकेड हटवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी पंजाबमधील तरुण शेतकरी जेसीबी आणि पोकलेन मशीन घेऊन सीमेवर आले आहेत. दरम्यान, हरियाणाच्या डीजीपीने पंजाबच्या डीजीपीला पत्र लिहिल्यानंतर, पंजाबच्या डीजीपींनी जेसीबी, पोकलेन, टिप्पर, हायड्रा आणि इतर जड पृथ्वी काढण्याची उपकरणे खनौरी आणि शंभूमध्ये पंजाब-हरियाणा सीमेकडे जाण्यास थांबवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, शेतकऱ्यांना थांबवताना शंभू पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अमन पाल सिंग विर्क आणि मोहालीचे एसपी जगविंदर सिंग चीमा जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. शंभू सीमेवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती.
पंजाब-हरियाणा सीमेवर सुमारे १४ हजारांहून अधिक शेतकरी आंदाेलक, 1,200 ट्रॅक्टर-ट्रॉली, 300 कार, 10 मिनी बसेससह लहान वाहनांसह जमले असल्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. पंजाब सरकारला पाठवलेल्या पत्रात केंद्रीय गृह मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था ही चिंतेची बाब आहे. कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेशही सरकारने दिला आहे.
हेही वाचा :