मनीष सिसोदिया यांना तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर | पुढारी

मनीष सिसोदिया यांना तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पार्टी (आप) नेते व दिल्‍लीचे माजी उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज दिल्ली न्यायालयाने तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी हा जामीन मंजूर करण्‍यात आला आहे.

सिसोदिया यांनी 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान लखनौमध्ये आपल्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन मागितला होता. विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी सिसोदिया यांना तीन दिवसांचा जामीन मंजूर केला. यावेळी सीबीआयच्या वकिलाने दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या जामीनाला विरोध केला होता. सिसोदिया हे अत्यंत प्रभावशाली व्यक्ती असून ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, असा दावा त्‍यांनी केला.

सीबीआयने असा युक्तिवाद केला होता की केवळ वधू आणि वर त्यांच्या लग्नासाठी पाच दिवसांची सुट्टी घेऊ शकतात. लग्नाला उपस्थित राहण्यासाठी एक दिवस दिला जाऊ शकतो, असे एजन्सीने म्हटले आहे. लग्न समारंभात पोलीस अधिकारी उपस्थित राहिल्‍यास योग्‍य राहिल का, अशी विचारणा न्यायालयाने सिसोदिया यांच्या वकिलांना केली. यावर त्‍यांनी “माझ्यासोबत पोलिस पाठवून माझ्या कुटुंबाचा अपमान करू नका, अशी विनंती सिसोदिया यांनी केली. मला तीन दिवसांची अंतिरम जामीन मिळाली नाही तरी चालेल; पण माझ्या सोबत पोलिस जाणार नाहीत, असे त्‍यांनी सांगितले.

सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी सिसोदिया यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक केली होती.सीबीआयने त्याच्या अटकेनंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याला संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 9 मार्च रोजी तिहार तुरुंगातून अटक केली होती.

हेही वाचा : 

 

 

Back to top button