पुढारी ऑनलाईन : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीने आता समीर वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी तपास सुरू केला आहे. त्यासाठी ईडीने एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. याबाबतची माहिती एनआयएन वृत्तसंस्थेने X वर पोस्ट करत दिली आहे.
या प्रकरणी वानखेडे यांना लवकरच ईडीकडून चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या एफआयआरच्या आधारे ईडीने समीर वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे, असे द टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्ज जप्त केल्याच्या प्रकरणानंतर वानखेडे चर्चेत आले होते. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
याशिवाय ईडीने सीबीआय भ्रष्टाचार प्रकरणातील तक्रारदार तसेच दक्षता विभागाचे अधीक्षक कपिल यांच्यासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तीन अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. दरम्यान, वानखेडे यांनी हा खटला रद्द करण्यात यावा आणि कोणत्याही सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
११ मे २०२३ रोजी दाखल करण्यात आलेल्या सीबीआयच्या एफआयआरमध्ये वानखेडे, एनसीबीचे माजी एसपी विश्व विजय सिंह, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन आणि दोन खासगी व्यक्ती किरण गोसावी आणि सॅनविले डिसोझा यांची नावे संशयित म्हणून आहेत. ऑक्टोबर २०२१ च्या कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरणात आर्यनला दोषी न ठरवण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडून २५ कोटींची मागणी करण्यात करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर लाचेची रक्कम १८ कोटी रुपयांवर आणली.
या प्रकरणातील वानखेडे आणि इतर संशयितांची सीबीआयने यापूर्वीच चौकशी केली आहे. दरम्यान, वानखेडे यांनी त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
हे ही वाचा :