Doctor Pre-Wedding Shoot : ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट; डॉक्टर सेवेतून बडतर्फ | पुढारी

Doctor Pre-Wedding Shoot : ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट; डॉक्टर सेवेतून बडतर्फ

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये (ओटी) आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत प्री-वेडिंग फोटोशूट केल्याबद्दल राज्य सरकारने शुक्रवारी एका डॉक्टरला सेवेतून बडतर्फ केले. चित्रदुर्ग जिल्ह्यातील भरमसागर येथे ही घटना घडली असून अभिषेक असे कंत्राटी डॉक्टरचे नाव आहे. (Doctor Pre-Wedding Shoot in OT)

संबंधित बातम्या : 

सरकारी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या डॉक्टरला सेवेतून बडतर्फ केल्याचे कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. “सरकारी रुग्णालये ही जनतेची सेवा करण्यासाठी असतात, वैयक्तिक कामासाठी नाहीत, अशी अनुशासनहीनता सहन करणार नाही,” असे मंत्री राव यांनी म्हटले आहे. (Doctor Pre-Wedding Shoot in OT)

भरमसागर सरकारी रुग्णालयातत डॉ. अभिषेक यांनी महिनाभरापूर्वीच आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. बुधवारी ऑपरेशन थिएटरमध्ये प्री- वेडिंग शूट केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या फोटोशूटमध्ये डॉ. अभिषेक रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहे, तर त्याची होणारी पत्नी त्याला मदत करत आहे. बनावट शस्त्रक्रिया करताना हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने डॉ. अभिषेक यांना बडतर्फ केले आहे. (Doctor Pre-Wedding Shoot in OT)

आरोग्य मंत्री राव यांनी सांगितले की, “आरोग्य विभागात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवा नियमानुसार कर्तव्य बजावावे. सरकारी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारचे गैरवर्तन होऊ नये, यासाठी मी संबंधित डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. शासनाकडून शासकीय रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा या सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी आहेत, हे जाणून प्रत्येकाने कर्तव्य बजावण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले. (Doctor Pre-Wedding Shoot in OT)

हेही वाचा : 

Back to top button