‘प्री – वेडिंग’ने होतोय विवाह संस्काराचा ‘सिनेमा’; नवश्रीमंतांत फोटोशूटची क्रेझ  | पुढारी

‘प्री - वेडिंग’ने होतोय विवाह संस्काराचा ‘सिनेमा’; नवश्रीमंतांत फोटोशूटची क्रेझ 

सांगली; सचिन सुतार : अलीकडे ‘प्री – वेडिंग फोटोशूट’ च्या नावाखाली खासगी आयुष्याचा ‘सिनेमा’ होऊ लागला आहे. खास करून नवश्रीमंतांत याची मोठी क्रेझ  आहे. यामुळे अनेक नवीन थाटलेले संसार सुरू होण्याआधीच मोडल्याची उदाहरणेही आहेत. या नव्या संकल्पनेला नैतिकतेच्या तारतम्याचा ‘सेन्सॉर’चे बंधन गरजेचे आहे. तसेच समाजमनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

लग्न जमल्यानंतर साखरपुडा होतो, त्यानंतर लग्नाची तारीख निश्चित केली जाते. मात्र याच दरम्यान अनेकवेळा नियोजित वर – वधू ‘प्री – वेडिंग फोटोशूट’साठी जातात. दोन तीन दिवस निसर्गरम्य परिसरात एखाद्या रिसॉर्टवर राहून गोड क्षणांचा तयार केलेला व्हिडीओ लग्नाच्या दिवशी मोठ्या स्क्रीनवर हौसेने दाखवला जातो.

आजी-आजोबा, आई -वडील, मामा, मावशी, काका, आत्या अशा वडीलधार्‍या नातेवाईकांसमोर वधू आणि वर धबधब्याखाली आंघोळ करताना, एकमेकांना कवेत घेत असलेली आक्षेपार्ह दृश्ये दाखवली जातात. नववधूला अशा स्थितीत पाहताना अनेकांना कसेनुसे वाटते. ‘मॉडर्न जमान्या’ च्या नावाखाली अगतिक वधू-पित्याचाही नाइलाज होतो. नवदाम्पत्याच्या खासगी जीवनाचा सिनेमा सर्वांसमोर ‘पाहण्याची’ वेळ आल्याने मान खाली घालण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरत नाही. शूटिंगच्यावेळी शॉर्ट, मिडी, स्कर्ट, थ्री – फोर्थ अशा सवय नसणार्‍या पाश्चात्य कपड्यात संकोचाने वावरणे यामुळे काही मुलींना बदनाम करण्याचे प्रकार घडत आहेत.

लग्न ठरले… ‘प्री – वेडिंग फोटोशूट’ झाले आणि त्यानंतर काही कारणाने लग्न मोडलं! त्या मुलीचे दुसरे लग्न ठरले मात्र पूर्वीच्या ‘प्री – वेडिंग फोटोशूट’ मधील आक्षेपार्ह फोटो सासरी प्रदर्शित झाल्याने दुसरे लग्नही मोडले आणि नववधूचा संसार सुरू होण्याआधी उद्ध्वस्त झाला. असे गैरप्रकार टाळण्यासाठी ‘प्री – वेडिंग फोटोशूट’ ला नैतिकतेचा, तारतम्याचा सेन्सॉर असण्याची गरज निर्माण झाली आहे.

वरदक्षिणा परवडली.. ‘प्री – वेडिंग फोटोशूट’ नको!

काही वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या संपूर्ण लग्नाचा जेवढा खर्च होता तितके पैसे मुलांच्या ‘प्री – वेडिंग फोटोशूट’ साठी आता लागतात. पूर्वी असणारी वरदक्षिणा बंद झाली, मात्र मुलाची हौस आहे म्हणून ‘प्री – वेडिंग फोटोशूट’ पाठवण्याची गळ वधू पित्याला घातली जाते. सगळेजण करतात म्हणून मुलीच्या प्रेमाखातर त्यांचाही नाईलाज होतो.

‘प्री – वेडिंग फोटोशूट’ इंडस्ट्रीच!

‘प्री – वेडिंग फोटोशूट’ साठी काही ठिकाणे चांगलीच प्रसिद्ध झाली आहेत. या लोकेशन्सवर वेगवेगळे आशय सूत्र असणारी नेपथ्य रचना, पाश्चात्य कपडे, अत्याधुनिक कॅमेरे, शॉर्टफिल्म प्रमाणे होणारे संपादन आणि दिग्दर्शक असा लवाजमा हजर असतो. अर्थात खर्चाचा आकडा देखील सामान्यांचे डोळे विस्फारून टाकणारा ठरतो.

नेमके साध्य काय?

नुकत्याच एका विवाह समारंभात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता पडताच शेजारी असणार्‍या मोठ्या पडद्यावर त्या दोघांच्या चुंबनाचा व्हिडीओ दाखवल्याने वडीलधारी मंडळींनी नाराजी व्यक्त केली. लग्नानंतर करायच्या गोष्टी लग्नापूर्वी करून त्या प्रदर्शित करून आपण नेमके काय साध्य करतोय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Back to top button