आता पोस्ट वेडिंग शूटचीही धूम; लग्नानंतर फोटोशूट करण्याकडे तरुण जोडप्यांचा कल | पुढारी

आता पोस्ट वेडिंग शूटचीही धूम; लग्नानंतर फोटोशूट करण्याकडे तरुण जोडप्यांचा कल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अथर्व आणि नेहाने चक्क लग्नानंतर फोटोशूट करण्यावर भर दिला अन् त्यांच्या लव्हस्टोरीवर आधारित थीमवर त्यांनी हे फोटोशूट करून घेतले…सोशल मीडियावर हे छायाचित्र शेअर करताच त्यावर लाइक्सचा वर्षाव झाला…ही आहे पोस्ट वेडिंग फोटोशूटची किमया…सध्या अथर्व आणि नेहाप्रमाणे अनेक तरुण जोडपी प्री वेडिंग शूट करण्यापेक्षा लग्नानंतर फोटोशूट करून घेण्याकडेच म्हणजेच पोस्ट वेडिंग फोटोशूट करण्याला प्राधान्य देत आहेत. वेगवेगळ्या लोकेशन्सवर आणि वेगवेगळ्या थीमनुसार ते फोटोशूट करण्यावर भर देत आहेत.

लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूट करण्याचा ट्रेंड तसा नवा नाही. परंतु काही दिवसांपासून प्री वेडिंग शूटला विरोध केला जात आहे. त्यामुळेच कुठेतरी आता तरुण जोडपी लग्न झाल्यावर फोटोशूट करून घेण्याला प्राधान्य देत असून, त्यासाठी छायाचित्रकारांसह व्हिडिओग्राफर्संना काम दिले जात आहे. लग्नानंतरच्या फोटोशूटसाठी थीम, लोकेशन आणि वेशभूषा ठरविण्याचे कामही जोडप्यांकडून होत असून, त्यांना हव्या त्या लोकेशनवर रीतसर परवानगी घेऊन आणि हव्या त्या थीमनुसार फोटोशूटसह व्हिडिओ शूट करून दिला जात आहे. लग्नानंतरच्या शूटमध्ये जोडप्यांसह त्यांचे कुटुंबीयही सहभागी होत आहेत. पुण्यासह मुंबई, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नागपूर आदी जिल्ह्यांमधील लोकेशन्सवर असे फोटोशूट होत आहेत.

पुणे फोटोग्राफर्स अ‍ॅण्ड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय काप्रे म्हणाले, पोस्ट वेडिंग फोटोशूटवर अनेक जोडपी भर देत आहेत. विविध वेशभूषा, विविध लोकेशन, थीमसह फोटोशूट तर होत आहेच. पण, व्हिडिओ आणि रिल्सही तयार करून घेतले जात आहे. छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर आठवडाभराची मेहनत घेऊन हे फोटोशूट करीत असून, त्यासाठी 10 हजार रुपयांच्या पुढे खर्च येत आहे. खासकरून वेगवेगळे रिल्स आणि व्हिडिओकडे अधिक कल आहे. छायाचित्रकार प्रणव तावरे म्हणाले, पोस्ट वेडिंग शूटसाठी आमची संपूर्ण टीम काम करीत आहे. त्यात छायाचित्रांसह व्हिडिओ आणि रिल्सही तयार करून देत आहोत. पोस्ट वेडिंग शूटला चांगली मागणी आहे. लव्हस्टोरीसह विविध थीमवर आम्ही हे शूट करीत आहोत.

समाजाकडून प्री-वेडिंग शूटला विरोध…

सध्या काही समाजांकडून प्री-वेडिंग शूट करण्याला विरोध होत आहे. त्याचे मूळ कारण लग्नाआधी प्री-वेडिंग शूट होते अन् त्यानंतर तुटणारी नाती, प्री-वेडिंग शूटमध्ये वाढलेली अश्लिलता …अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आता धार्मिक संस्थांकडून आणि समाजाकडून प्री-वेडिंग शूटला विरोध केला जात आहे. काही प्रकरणे तर न्यायालयापर्यंत पोचली असून, त्यामुळेच प्री-वेडिंगला चाललेला विरोध पाहता, आता लग्नानंतरच्या पोस्ट-वेडिंग शूटला प्राधान्य दिले जात आहे, म्हणूनच पोस्ट-वेडिंग शूट करण्यासाठी मागणी वाढत आहे.

Back to top button