Rahul Gandhi News : राहुल गांधींनी ‘त्या’ प्रकरणावर माफी मागावी, अन्यथा...; मागासवर्ग आयोगाचा इशारा | पुढारी

Rahul Gandhi News : राहुल गांधींनी ‘त्या’ प्रकरणावर माफी मागावी, अन्यथा...; मागासवर्ग आयोगाचा इशारा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे ओबीसी आहेत, हा राहुल गांधींनी केलेला आरोप तथ्यहीन आहे. हे आरोप बिनबुडाचे असून प्रसिद्धीसाठी करण्यात आलेले निष्फळ प्रयत्न आहेत. यामुळे ओबासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, राहुल गांधींनी या प्रकरणी माफी मागावी, अन्यथा त्यांना नोटीस पाठविण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिला आहे. Rahul Gandhi News

भारत जोडे न्याय यात्रेदरम्यान एका जाहीर सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओबीसी असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या मुद्द्याची गंभीर दखल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून घेण्यात आली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, राहुल गांधींनी चूक केली आहे. त्यांनी देशभरातील ओबीसी समाजाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी, देशभरातील ओबीसी समाजात राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे रोष असल्याचेही ते म्हणाले. Rahul Gandhi News

पुढे बोलताना अहिर म्हणाले की, राहुल गांधींच्या वक्तव्याने अनेक लोकांना वाईट वाटले आहे, त्यांच्या वक्तव्याचा राग आला आहे. राहुल गांधींच्या मनात ओबीसी समाजाबद्दल किती द्वेष आहे, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांचे वक्तव्य पुरेसे आहे. त्यांना हा द्वेष पूर्वजांकडूनच मिळालेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात मिळाला. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी काँग्रेसचे सरकार असताना यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. आणि आज राहुल गांधी करोडो ओबीसी लोकांना अपमानित करत आहेत, लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींनी या प्रकरणात तातडीने माफी मागावी, तसे न केल्यास आणि राहुल गांधींच्या विरुद्ध ओबीसी समाजातील कुठल्याही व्यक्तीने समाज घटकाने तक्रार केल्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोग त्यांना नोटीस पाठवण्याबाबत विचार करेल, असेही मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले.

Rahul Gandhi News  : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मोध घांची’ जातीत मोडतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मोध घांची’ या जातीत मोडतात. देशभरात विविध ठिकाणी या जातीला तेली या नावानेही ओळखले जाते. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने स्पष्ट केले की, मोध घांची या जातीला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची अधिसूचना २५ जुलै १९९४ ला गुजरात सरकारने काढली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने १९९७ मध्ये केंद्र सरकारला गुजरात राज्याच्या ओबीसींच्या केंद्रीय यादीमध्ये मोध-घांचीचा समावेश करण्यासाठी सल्ला दिला. त्यानंतर १९९९ मध्ये ‘मोध घांची’ या जातीला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आले. या सर्व कालावधी दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतेही पद नव्हते, असेही मागासवर्ग आयोगाने सांगितले.

हेही वाचा 

Back to top button