BJP criticizes Rahul Gandhi : राहुल गांधी करतात भारत जोडो यात्रा, पण त्यांच्या खासदारांची देश विभागण्याची भाषा : भाजपची टीका | पुढारी

BJP criticizes Rahul Gandhi : राहुल गांधी करतात भारत जोडो यात्रा, पण त्यांच्या खासदारांची देश विभागण्याची भाषा : भाजपची टीका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : BJP criticizes Rahul Gandhi : काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांच्या वक्तव्यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रा करतात आणि दुसऱ्या बाजुला त्यांचे खासदार देश विभागण्याची भाषा करतात. यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी माफी मागणार का? असा सवाल भाजपने केला आहे. तसेच डी. के. सुरेश यांच्यावर कारवाईची मागणी भाजपने केली आहे.

खासदार डी. के. सुरेश यांनी दक्षिणेकडील राज्यांना मिळणाऱ्या निधीवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरुन चांगलाच गदारोळ सुरु झाला आहे. या मुद्द्यावर भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतही आवाज उठवला. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत घेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीकेची झोड उठवली. राजकीय फायद्यासाठी काँग्रेस आता या पातळीवर येणार का, असा खोचक सवाल त्यांनी विचारला.? विविध कलमांचा दाखला देत डी. के. सुरेश यांना खासदार राहण्याचा अधिकार नाही. असेही ते म्हणाले. संविधानातील कलम १ चा दाखल देत संघराज्य पद्धतीबद्दल त्यांनी भाष्य केले.

डी. के. सुरेश हे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे भाऊ आहेत. आणि ३३८ कोटी संपत्तीचे मालक आहेत. याचाही उल्लेख त्यांनी केला. डी. के. सुरेश यांचे वक्तव्य लज्जास्पद आणि असंवैधानिक आहे. तसेच भारताची एकता आणि अखंडतेसह संविधानाचेही उल्लंघन आहे. मात्र या प्रकारावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी शांत आहेत. इंडिया आघाडी शांत आहे, असेही रवी शंकर प्रसाद म्हणाले.

कर्नाटकबद्दल बोलताना प्रसाद म्हणाले की, पंतप्रधानांनी अलीकडेच विविध प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी बंगळुरूला भेट दिली होती. बंगळुरू आयटी हब आहे, तिथे अनेक मोबाईल निर्मीती कंपन्या सुरू झाल्या. तसेच राज्यांना देण्यात येणाऱ्या कर परताव्यानुसार मोदी सरकारने टॅक्स परतावा १.३ लाख कोटी दिला तर काँग्रेस सरकारने मात्र ५३ हजार ३९६ कोटी दिल्याचेही ते म्हणाले. कर्नाटक आणि दक्षिणेसह देशातील सर्वच राज्य महत्वाची आहेत. देशातील इतर राज्यांसह कर्नाटकचाही आम्हाला अभिमान आहे. असेही ते म्हणाले. डी. के. सुरेश यांचे आरोप चुकीचे आहेत. आम्ही संसदीय पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहोत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. दरम्यान, आचरण समितीने यावर काय करायचे ते आचरण समितीच ठरवेल. असेही ते म्हणाले.

Back to top button